इयत्ता सातवी आठवी पासून विज्ञानाच्या पुस्तकातले पुनरुत्पत्तीचे प्रकरण वाचून कुतुहल चाळवले होते. (वर्गात का कोण जाणे हे प्रकरण तपशीलाने शिकवले नव्हते.) त्यातल्या फुलांच्या परागीभवनाचे आणि फलधारणेचे विषय वाचून माणसात नेमकी गर्भधारणा कशी होते त्याविषयी जिज्ञासा वाढली. शिक्षकांकडून ही माहिती मिळणे शक्य नव्हते. तरी काही विद्यार्थ्यांनी त्यांना घरी, मित्रांकडून वा इतरत्र समाजात मिळालेली माहितीची आपापसात देवाणघेवाण करायला सुरवात केली. सगळ्यांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने असेच होत असावे. ह्यातून सुरवातीला जे आमचे जे 'ज्ञान' निर्माण झाले त्यात कितीतरी चुका होत्या (हे अर्थात नंतर कळले.)
मला हे सांगायचे आहे, की अशा मित्रामित्रांत होणाऱ्या वैचारिक देवघेवीचा गांभीर्याने विचार करून लैंगिक शिक्षणाचा प्रसार अशा प्रकारे समवयीन मुलांचे छोटे छोटे समूह करून आणि त्यातल्या त्यात जाणत्या आणि समजूतदार विद्यार्थ्याना इतरांना ही माहिती कशी द्यायची त्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकरवी त्या माहितीचा प्रसार केल्यास ही योजना जास्त प्रभावी होईल. अर्थात शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ ह्याला अधिक नेमकी दिशा देऊ शकतील ह्यात शंका नाही.
(द्रष्टा)
-प्रदीप