अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचा मार्ग. कोऽहम्? त्याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. याचाच अर्थ आत्मशोध. ते म्हणजे साध्य.  
तिथे जन्म-मृत्यू, जरा-व्याधी, सुख-दुःख या सर्व गोष्टींचा संबंधच येत नाही. कारण हे सर्व शरीराशी अन् पर्यायाने भौतिक जगताशी निगडित आहे. आणि शरीर हे साधन आहे, साध्य साधायला असलेले साधन. ते स्वतः साध्य नाही.

एक गफलत केली जाते. ती म्हणजे - मोक्षप्राप्ती म्हणजे साध्य. तेच ध्येय.
यावर नीट विचार केला तर समजून येईल की ती आपसूक येणारी गोष्ट आहे. ज्याला कोऽहम् चे उत्तर प्रत्यक्ष मिळाले (प्रत्यक्ष अनुभव आला) त्यास मोक्षप्राप्ती आपसूक येणार. जसे प्रकाश झाला की अंधार जातो, अंधाराला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नाही. तसे.

यावरून आपोआप असे दिसून येईल की, विज्ञान हे भौतिक जगतातल्या प्रश्नांची उकल करण्यासाठीचे शास्त्र आहे. (पंचकोषांबद्दलची माहिती वाचावी. त्यावरून याविषयी आणखी खोलात माहिती मिळेल.) म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे विज्ञान हे भौतिक गोष्टींबद्दल थोड्याफार प्रमाणात काही सांगू शकते. तेच त्याचे प्रयोजन आहे.

त्यामुळे, विज्ञानाचे कार्यक्षेत्र वेगळे असल्यामुळे त्याची अध्यात्माशी तुलना होवू शकत नाही.

राहिल्या देवपूजा, मंत्रशक्ती, ज्योतिष, देव, भूत, अतींद्रिय शक्ती, पुनर्जन्म या गोष्टी.
एखाद्याला आलेले अनुभव आपल्याला आले नाहीत म्हणून खरे-खोटे करत बसणे निरर्थक आहे असे मला वाटते.
ज्याचे साध्य आत्मशोध आहे त्यास हे सर्व खरे-खोटे करत बसण्याची कसली गरज. आपापला मार्ग निवडावा अन् कामी लागावे. अनुभव आपोआप येतात. पण ज्याचे साध्य पक्के ठरलेले असेल तो या सर्वांशी आपोआपच अलिप्त होतो.