श्रीराम ! (अगदी "असंभव" मधल्या त्या आजोबांच्या स्टाईल मध्ये). माझ्या एका अनुभवकथनावर इतकी चर्चा होईल असं मला आईशप्पथ वाटलं नव्हतं. कल्याणयोगी, मन्जूशा, ओंकारस्वरूप ह्यांनी आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. लस्टर साहेबांनी (का मॅडमनी? ) " रंग माझा वेगळा" म्हणत हा लेख वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवला. तेजस१९७४ म्हणतात त्याप्रमाणे मला फक्त माझा अनुभव आणि मला भारतानी केलेल्या प्रगतीचा (जी वादातीत आहे) सार्थ अभिमान मांडायचा होता.
आयुष्यात काही "अविस्मरणीय" क्षण येतात. मे १९९८ च्या पोखरण चाचण्यांच्यावेळी भारतीय असण्याची अशी "धुंदी" आल्याचे स्मरते. "आम्ही बलाढ्य आहोत... आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही" अशी एक नशा त्या कॉलेजवयात आली होती. तशीच काहीशी नशा ह्या अनुभवांमध्ये आली. प्रत्येक देशाच्या वर्तमानात चांगल्या - वाईट दोन्ही बाजू असणारच. त्यांचा ऊहापोह करायचा ह्या लेखाचा उद्देश नाही. शेतकऱ्यांच्या आत्माहत्या, महागाई, अतिरेकी कारवाया. भ्रष्टाचार इथपासून ते ट्रॅफिक नियम मोडण्याची आमची वृत्ती (मी पुण्याचा आहे हे तुम्ही ओळखलं असेलच! ), रस्त्यावर थुंकण्याची आमची किळसवाणी सवय... इथपर्यंत मला शरम वाटण्यासारखा गोष्टी आहेतच.
गेले ३ वर्षं लोकांच्या (गोऱ्यांचा उल्लेख अशासाठी की हे लोक स्वतःला सुपीरियर समजतात) बदलत्या प्रतिक्रिया मी अनुभवतोय. आणि माझ्या देशबांधवांनी घडवलेल्या बदलाचा मला अभिमानच आहे. अजून ह्या बाबतीत खूप लिहीता येईल... पण इथेच थांबतो.
.... आणि हो... शाहरुख खान, ऐश्वर्या बच्चन, शिल्पा शेट्टी हे माझे नातेवाईक नाहीत. आता ती मंडळी आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत त्याला कोण काय करणार ? आणि त्यांचं कौशल्य, त्यांची मेहेनत, त्यांनि स्वतःचं केलेलं "मार्केटिंग" ह्याबद्दल बोटं मोडणारे आपण कोण? त्यांनी काय फक्त 'विधायक' कामंच करायला हवीत का ?