पुणेरी जोशी,
नमस्कार...
दोन जुन्या आठवणी जागवल्यात तुम्ही. फार बरे वाटले. धन्यवाद.
१) प्रा. रमेश ज्ञाते सध्या अहमदनगर येथे राहतात, असे कळते. मात्र, त्या शहरात नेमके कोठे, याची मला कल्पना नाही.
कॉलेजात शिकायला पुण्यात आलेल्या माझ्या एका मित्राचे ते पंधरा-वीस वर्षांपूर्वी रूम पार्टनर होते. छान गप्पा मारत असत. आमची वये पाहून आम्हाला झेपतील अशा तत्त्वज्ञानाच्या काही गोष्टी ते आम्हाला या गप्पांच्या ओघात सांगत. त्यांना पाहिले की वाटेच, की हे तत्त्वज्ञ असणार ! करडी दाढी; शांत, सौम्य चेहरा. आवाज काहीसा बसका.
त्या वेळी प्रेमभंग झालेल्या आमच्या एका मित्राची त्यांनी समजूत घातली होती...ती आजही आठवते...
ते म्हणाले होते की, अरे, तू आज ज्या गोष्टीला भलेमोठे वर्तुळ समजून बसला आहेस आणि या वर्तुळाने तुझ्या आय़ुष्याला आज व्यापून टाकले आहे...परंतु काही काळ गेला की तुझे तुलाच कळून येईल की, हे महावर्तुळ म्हणजे आता केवळ एक बिंदू बनून राहिलेला आहे... ! आमचा हा मित्र प्रेमभंगाच्या दुःखातून त्या वेळी काही अंशी तरी सावरला होता !
त्या वेळी त्यांनी आम्हाला त्यांचा एक कथासंग्रहही वाचायला दिला होता. आज त्याचे नाव मात्र मला आठवत नाही. या पुस्तकातील एका कथेतील वर्णन आम्ही (मिटक्या मारत) पुन्हा पुन्हा वाचायचो ! :)
सार्त्र गेला त्या रात्री...हे त्यांचे पुस्तक मी वाचलेले आहे. सरांनी बरीच पुस्तके लिहिली असावीत. पुढे ज्ञाते सरांनी पुणे सोडले. आमच्याही वाटा वेगळ्या झाल्या; त्यांच्याशी संपर्कच उरला नाही...पण त्यांचा रूम पार्टनर असलेला माझा मित्र मला भेटला की सरांची आठवण निघाल्याशिवाय राहत नाही.
२) अमूकचे स्वातंत्र्य या शशांक ओक यांच्या पुस्तकाचाही फडशा दोन दिवसांत पाडला होता.
हे पुस्तक मला खूप आवडले ; पण या पुस्तकाचा शेवट गुंडाळल्यासारखा वाटला होता...ओक यांची इतर पुस्तके असतील तर माहीत नाहीत.