वर सार्वजनिक दूरध्वनी यंत्राचा उल्लेख आलेला आहे. त्याबद्दल ऐकलेली एक गोष्ट. त्या यंत्रात नाणे टाकून एकदा संभाषण संपले की रिसीव्हर खाली न ठेवता शून्य क्रमांक फिरवून अत्यंत हळू हळू सोडल्यास पुढचा फोन करण्यासाठी डायल टोन येऊ लागत असे. (हे शोधून कसे काढले असेल? )

आणखी एक ऐकलेली गोष्ट - आयायटीत प्रत्येक वसतिगृहातून फोन करण्यासाठे सार्वजनिक दूरध्वनी बसवलेले होते. एका वसतिगृहातल्या काही चलाख मुलांनी एक नाणे तारेला बांधून ठेवलेले होते. ते घालून फोन करायचा. आणि संभाषण झाल्यावर रिसीव्हर ठेवल्यावर यंत्राला नाणे घेता येत नसे, ते तारेने पुन्हा वर काढून घ्यायचे.

काही दिवसांनी टेलिफोन विभागाला ह्याचा पत्ता लागला. त्याचा तपास करायला त्यांचा तंत्रज्ञ त्या वसतिगृहात येऊन त्या यंत्राशी काही खटपट करताना काही मुलांना दिसला. हा एखादा नव्याने आलेला एखादा पदव्युत्तर विद्यार्थी असेल अशा कल्पनेने त्याला 'दूरध्वनी करण्यासाठी मदत' करायला एकजण तत्परतेने पुढे झाला. ते तारायंत्र कसे वापरायचे ह्याची तपशीलवार माहिती त्याने इतक्या तन्मयतेने त्याला दिली, की तो तंत्रज्ञ अवाक् झाला!.