अशीच परिस्थिती दर शनिवारी पाहायला मिळते. तेथे जवळच एक मारुतीचे मंदिर आहे. तेथे दर शनिवारी संध्याकाळी तेलाचे किंवा रुईच्या हारांचे आमिष घेऊन लोक रांगेने उभे राहिलेले असतात. जवळच भिकाऱ्यांचीही बैठी रांग असते. लोक त्यांना दानधर्म करीत असतात. त्या रांगांमुळे वाहतूक संथच चालते. (सुदैव, शिवाजी रस्ता एकमार्गी आहे) आणि दुसऱ्या दिवशी इतका उष्ट्या-खरकट्याचा पसारा पसरलेला असतो, की त्या रस्त्यावरून चालावेही वाटत नाही. अलीकडेच हनुमान जयंतीच्या दिवशी ही रांग कसबा पेठ पोलीस चौकीच्याही पलीकडे गेली होती. असला पुण्यसंचय पुण्यनगरीचे कशाचे भले करणार, हा प्रश्न मात्र त्या रागांना विचारला नाही. आमच्यासारख्या पाखंड्यांशी अपशब्दांचा वापर करून भांडल्याचे पाप त्यांना लागले असते. त्यांत आम्ही मुळचे बारामतीकर म्हणजे आधीच वाईट.
अवधूत.