ह्या प्रश्नाचे सोप्या शब्दांत उत्तर द्यायचे झाल्यासः माणसाच्या मेंदूचा (आणि संपूर्ण मज्जासंस्थेचा) एक महत्त्वाचा घटक म्हणजे न्यूरॉन नावाची एक पेशी. ही पेशी विद्युत् लहरींच्या स्वरूपात माहितीची देवाणघेवाण करण्याचे काम करते. माणसाला पंचेंद्रियांकडून स्पर्श, चव, गंध आणि दृक्श्राव्य स्वरूपात मिळणारी माहिती, भूतकाळातील घटनांबद्दल मेंदूत साठवून ठेवलेली माहिती आणि माणसाच्या शरीरातील संप्रेरके (hormones) ह्या विद्युत् लहरींच्या 'व्होल्टेज'चे नियमन करतात आणि ह्याच विद्युत् लहरींमुळे माणूस 'विचार' करतो, त्याच्या मनात भावना येतात.
उदाहरणार्थ१, पुरुषाच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन (testosterone) नावाचे एक संप्रेरक असते. एखादी स्त्री बघितल्यावर तिचा वर्ण, उंची, बांधा वगैरे माहिती डोळ्यांवाटे मेंदूपर्यंत पोचते आणि ती माहिती 'प्रोसेस' केल्यावर त्यानुसार मज्जासंस्थेकडून संप्रेरके स्रवणाऱ्या ग्रंथींकडे विद्युत् लहरींच्या स्वरूपात जाते. ह्या माहितीच्या आधारे विशिष्ट प्रमाणात टेस्टोस्टेरॉन स्रवते. ज्या प्रमाणात टेस्टोस्टेरॉन स्रवते त्या प्रमाणानुसार मेंदूत जाणाऱ्या विद्युत् लहरींचे व्होल्टेज ठरते आणि त्या स्त्रीबद्दल पुरुषाच्या मनात वेगवेगळ्या भावना येतात. स्त्रीच्या शरीरातदेखील हे संप्रेरक असते. पण त्याचे प्रमाण पुरुषाच्या मानाने फारच कमी असते. हे प्रमाण लक्षात घेतल्यास स्त्री आणि पुरुषाच्या वागण्यातील एका प्रमुख फरकाचे कारण लक्षात येईल.
मला वाटते वरील माहिती पुरेशी असेल. अपुरी वाटल्यास क्षमस्व. माहितीच्या महाजालावर ही माहिती निश्चितच मिळेल. विकिपिडिया हा एक बऱ्यापैकी विश्वासार्ह असा माहितीचा स्रोत आहे.
१हे उदाहरण मुद्दाम घेतले आहे. अनेकांना समजायला सोपे पडेल म्हणून!