मुमुक्षु म्हणतात त्याप्रमाणे अध्यात्म म्हणजे काय ह्याचा नीट विचार होणे गरजेचे आहे.
पण ह्या चर्चेची सुरुवात ज्या लेखाने झाली त्यात लेखक म्हणतात, 'काँप्युटर बनते सिलिकॉन धातूंच्या चिप्स पासून. तो धातू पृथ्वीच्यापोटात आधीपासूनच होता. आपण फक्त विचार करून तो वापरला. हा वापरण्यासाठीचा विचार विशीष्ट व्यक्तीच्या मनात विशीष्ट वेळेस का येतो? या सगळ्या गोष्टींच्या उत्तरासाठी अध्यात्म आहे.' पुढे लेखक म्हणतात, 'विज्ञानयुग आहे म्हणून ज्योतिष, देव, अध्यात्म, भूत, अतिंद्रीय शक्ती नाहीतच असे म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या नियमात बसवता आल्या नाहीत म्हणून त्या गोष्टी लगेच खोट्या ठरत नाहीत.'
हे मुद्दे विचारात घेता मला काही प्रश्न पडत होते ते मी विचारत होतो आणि माझी काही मते होती ती मी मांडत होतो.
माझा मूळ विरोध अध्यात्मवादाला आहे. पण पंचाईत अशी होते की मी जे काही अध्यात्म म्हणून आजूबाजूला बघतो ते इतके विचित्र आहे की मग प्रश्न पडतो की ह्या अशा अध्यात्माला का म्हणून विरोध करू नये?
मुमुक्षु, तुम्ही म्हणतात ते खरे आहे. 'ज्याचे साध्य आत्मशोध आहे त्यास हे सर्व खरे-खोटे करत बसण्याची कसली गरज. आपापला मार्ग निवडावा अन् कामी लागावे. अनुभव आपोआप येतात. पण ज्याचे साध्य पक्के ठरलेले असेल तो या सर्वांशी आपोआपच अलिप्त होतो.'
पण मी आजपर्यंतच्या अल्पायुष्यात जे काही अध्यात्म (आणि आध्यात्मिक) म्हणून पाहिले आहे ते असे बिल्कुल नाही.
प्रत्येक जण हा साध्यापेक्षा साधनातच अडकलेला आणि साधनालाच महत्त्व देणारा पाहिला आहे. 'साधने'ला महत्त्व देण्याऐवजी 'साधना'ला महत्त्व देणारेच जास्त... (हा बहुतेक मराठीत सामान्यरूप कसे करतात हे माहीत नसल्याचा परिणाम असावा...)
जेव्हा हे 'आध्यात्मिक' लोक म्हणतात की 'तर्कापलीकडचे ते अध्यात्म', जेव्हा ते विचारतात, 'आपल्या मनातील विचारांवर कशाचे नियंत्रण असते? याचे विज्ञानाकडून काय उत्तर आहे?' तेव्हा एक जुनी गोष्ट आठवते:
पूर्वी 'देवी' हा रोग कशामुळे होतो हे माहीत नव्हते. कित्येक लोक ह्या 'देवी'चे शिकार झाले. पटापट मरून पडू लागले. नाहीतर तापाने अतिशय फणफणू लागले. तेव्हा 'आध्यात्मिक' लोक म्हणाले, 'तर्कापलीकडचे ते अध्यात्म' ' देवीचा रोग का होतो? एखाद्याच्या शरीरावर अचानक असे फोड-चट्टे का उठतात? त्याला अचानक एवढा ताप का भरून येतो? याचे विज्ञानाकडून काय उत्तर आहे? अध्यात्माकडे ह्याचे उत्तर आहे. समाजाने केलेल्या काही अक्षम्य चुकांमुळे 'देवी'चा कोप होतो आणि लोकांना हा त्रास सहन करावा लागतो. ह्यावर उपाय? सहन करा आणि यज्ञयाग करून 'देवी'ला शांत करा.
नंतर अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये एडवर्ड जेन्नर नावाचा कोणीतरी वेडा माणूस (ह्याला काही लोक 'शास्त्रज्ञ' आणि 'डॉक्टर'सुद्धा म्हणतात) ह्या रोगावर लस शोधून काढतो. आणि अचानक 'देवी'ला शांत करण्यासाठी होणारे यज्ञयाग थांबून लोक लस टोचून घेऊ लागतात...
पण मला मात्र आता चित्त यांचे म्हणणं पटतंय आणि मनावर घ्यावंसं वाटतंय...