माझ्या अनुभवावरून सांगते.
खूप पूर्वी आमच्या घरी लग्नानिमित्त सर्व नातेवाईक जमले होते. त्यात एका मुलाने खेळता खेळता खेळ म्हणून एक बाहुली घेतली आणि तिच्यात कात्री भोसकू (अगदी ऍक्शन वगैरे करून) लागला. आम्ही सर्व तुमच्याप्रमाणेच चकित झालो की तो हे कोठे शिकला असेल? तेव्हातर टीव्हीही नव्हते आणि पेपरातूनही अशा बातम्या येत नसत. आल्या तरी त्या वाचता येण्याइतपत त्याचे वय नव्हते. मग तो हे कोठे शिकला असेल? शेवटी त्याच्या आईने न रागावता हळू हळू त्याच्याकडून काढून घेतले तेव्हा कळले ते असे -
सर्व जमलेले नातेवाईक आदल्या रात्री सिनेमा पाहायला गेले होते. कोठला तर आराधना! आता आराधना हा काही हिंसा दाखवणारा सिनेमा नव्हे! तरी त्यात नायिकेवर (शर्मिला टागोर) हात टाकणाऱ्या खलनायकाला (मनमोहन) छोटा मुलगा (सूरज? ) कात्रीने भोसकतो असे दृश्य आहे. कमाल म्हणजे आम्ही सगळे आराधनाची गाणी बिणी ह्यात डोके घालत असताना हा भोसकण्याचा प्रसंग विसरूनही गेलो होतो. मात्र त्याच्या बाकी सिनेमासोडून हेच लक्षात राहिले! मला खात्री आहे तुम्हालाही आराधनातले हे दृश्य लक्षात रहिलेले असण्याची शक्यता फार कमी आहे.
कदाचित असे असेल. आपल्याशी नाते सांगणारे जे असेल त्याचा प्रभाव पडतो. कारण आमचे लक्ष सिनेमातली गाणी आणि शर्मिला टागोरची केशभूषा इकडेच असताना त्याचे लक्ष मात्र एका मुलाच्या भूमिकेकडे तन्मयतेने लागले. त्या सिनेमातल्या मुलाची त्याला सहानुभूती वाटली असणार.