आदित्य आणि अन्य सर्वचजण...

नमस्कार

मराठी मजकूर टाईप (टंकणे की काय, असे म्हणतात, त्याला !) करताना घडलेल्या चुका आणि मुळातच शुद्धलेखन येत नसल्याने (केवळ आदित्यलाच नव्हे; आदित्यसारख्या अनेकांना) होऊ शकणाऱ्या चुका...अशा दोन बाबींची सरमिसळ वरील चर्चेत झालेली असावी की काय, असा प्रश्न माझ्या मनात सर्व मत-मतांतरे वाचून आला...

उदाहरणार्थ ः आदित्यचे याच लेखातील एकच छोटेसे वाक्य घेऊ या - (काय गल्लत झालेली आहे, ते दाखविण्यासाठीच केवळ हे उदाहरण घेतले आहे. यात आदित्यच्या चुका दाखविण्याचा अजिबातच उद्देश नाही. (हा प्रतिसाद लिहिण्यामागे माझा तो हेतूही नाही...)

आदित्यचे वाक्य असे आहे -  ...आणि बऱ्याचवेळा तो बरोबर शब्द सुद्धा चुक दखवून पुन्हा तोच 'हे बदला' मध्ये देतो.
आता या वाक्यात काय चुका आहेत, ते पाहू या - 

१) शब्द सुद्धा - हे दोन्ही शब्द जोडून हवेत (हे शब्द जोडून लिहिले जातात, हे लिहिणाऱ्याला (केवळ आदित्यलाच नव्हे; लिहिणाऱ्या प्रत्येकालाच) माहीत असणे आवश्यक आहे. सुद्धा हा शब्द ही ची भूमिका पार पाडत असतो. आपण शब्दही असे लिहिले तर ते जोडून लिहू. शब्द ही असे तोडून नव्हे. म्हणून मग शब्दसुद्धा असे लिहायला हवे. )

२) चुक - हा शब्द असा लिहितात-  चूक. (इथे च चा उकार दीर्घ असतो, हे लिहिणाऱ्याला (केवळ आदित्यलाच नव्हे; लिहिणाऱ्या प्रत्येकालाच) माहीत असणे आवश्यक आहे. ते माहीत असेल तर लिहिणारा संबंधित कुणीही अशी चूक अनवधानानेही करणार नाही. )

३) दखवून - इथे आदित्यकडून टाईप करताना द ला काना द्यायचा राहून गेला आहे.

थोडक्यात, काही चुका शुद्धलेखनाच्या (चुक) तर काही चुका टाईप करताना (दखवून) झालेल्या..अशी ही सरमिसळ आहे...

माझे मत विचाराल तर शुद्धलेखनाबाबत मी पराकोटीचा आग्रही आहे. (तरीही  ट्रकवाला या आदित्यच्या लेखाला प्रतिसाद देताना मी त्यातील चुकांचा उल्लेख केला नाही.  कारण, माणूस नवा असेल, निर्ढावलेला नसेल तर नामोहरम,नाउमेद लगेचच होऊ शकतो. (जसा तो सध्या झालेला आहे...). आदित्यकडे सांगण्यासारखे भरपूर आहे...ऊर्जा आहे. ऊर्मी आहे. शैली आहे....त्या ऊर्जेचे, ऊर्मीचे, शैलीचे कौतुक करायला हवे की नको ? पांढऱ्या कागदावरील केवळ काळा ठिपकाच तेवढा कशासाठी पाहायचा ? आधी पांढऱ्या कागदाच्या धवलतेचे कौतुक करू या ना आपण सारे...! )

हां, शुद्धलेखन येत नसेल तर शिकून घ्यावे, असे मी म्हणेन. मायबोली शुद्ध स्वरूपात लिहिता आलीच पाहिजे, ही माझी भूमिका आहे... आदित्यने ही गोष्ट आवर्जून करावी... आपली भाषा आपल्याला शुद्ध लिहिता आली / येत असेल, तर तो आनंद अवर्णनीय असतो, हे मी आदित्यला सांगू इच्छितो.

टाईप करताना घडणाऱ्या चुका टाळण्यासाठी एक करता येईल. टाईप केलेला मजकूर येथे सादर करण्यापूर्वी एकदा अगदी बारकाईने वाचायचा...चुकांचे खडे नक्कीच निवडता येतील, त्या वाचनात !

आता सगळ्यांत महत्त्वाचे - 

आदित्य, 

तू मनोगत वर रुसू नयेस. येथे लिहायचेच नाही, असे म्हणू नयेस. काहीजण शुद्धलेखनातील चुकांचे अवडंबर माजवतील, बाऊ करतील, ( तेही किती दिवस ? तर अगदी थोडेच दिवस...कारण तू शुद्धलेखन लवकरच शिकून घेणार आहेस :) ) शुद्धलेखनाचा आग्रह धरणाऱ्यांकडेही शुद्ध नजरेनेच पाहा :)  काहीजण समजून घेतील...समजून घेणाऱ्यांसाठी तरी लिहायला हवे....आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले आहे, असे तर तू मुळीचच समजू नयेस.  लिहिण्याचा खास हात प्रत्येकालाच असतो, असे नाही.  तुला तो आहे. हा हात मनोगतसाठी तू आखडता घेऊ नयेस...बघ, योग्य तो विचार कर....तुझ्या नव्या लेखनाची प्रतीक्षा करणारे करत राहतील. निर्णय तुझ्या (लिहित्या) हाती...!!! मी तुझ्या नव्या लेखाची येथेच वाट पाहीन...

रागाची तीव्रता काळाबरोबर कमी होत जाते आणि  स्वतःच्याच शब्दात अडकायला होते...!!! बकुळ यांनी साध्या भाषेत किती मोठी गोष्ट अगदी सहजपणे सांगितली आहे...ही गोष्टही ध्यानात ठेव...

तुला माझ्या मनापासून शुभेच्छा....

- प्रदीप कुलकर्णी