द्वारकानाथ आणि राधिका यांच्या मध्ये झालेल्या या संभाषणात बरेच महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले आहेत. ही चर्चा नवीन सदर म्हणून चालू व्हावी अशी माझीही इच्छा आहे. माझी व्यक्तिगत मते मी खाली व्यक्त केली आहेत.

परंतु तो पर्यायी शब्द त्याला अचूक बसला पाहिजे. बरोबर तिच अर्थछटा दाखवत असला पाहिजे

हा मुद्दा तितकासा पटत नाही. टॅलेंट चे उदाहरण घेऊ.

टॅलेंट हा शब्द जेव्हा पहिल्यांदा वापरात आला तेव्हा त्याचा असा अर्थ नसेलही. पण हळू हळू वापरून वापरून त्याला असा अर्थ प्राप्त झाला. त्याचा मूळ अर्थ कदाचित प्रतिभा, बुद्धिमत्ता असाच आहे. कधी कधी तो कसब, कला असा पण वापरला जातो (यासाठी पण प्रतिभा हा शब्द मला योग्य वाटतो.) त्यामुळे जोपर्यंत आपण वापर करत नाही एखाद्या शब्दाचा तोपर्यंत त्याला तसा अर्थ प्राप्त होणारच नाही. आपण वापरायला सुरुवात करू अन् आपली भाषा समृद्ध होत जाईल.

मनोगत तसा जागतिक मंच आहे. जागतिक पातळीवर आता जे काही होईल (म्हणजे आपण हे काही करू) ते पुढे आपल्या मातृभाषेचे आधारस्तंभ बनणार आहे. कारण आता तर सुरुवात आहे. पुढे सगळे जग या माहितीजालात येईल तेव्हा आता बनलेल्या पायावर उभे राहणार आहे. कदाचित मनोगताचे शुद्धलेखनचिकित्सक हे त्याचे मुख्य मार्गदर्शक असेल. तेव्हा हा वेगवान उत्क्रांतीचा काळ आहे. आपल्याकडे काही नाही असे म्हणण्यापेक्षा ते नव्याने निर्माण करण्याची आताच वेळ आहे. त्यामुळे द्वारकानाथांनी म्हटल्याप्रमाणे शब्द वापरत चला रुचतील ते उरतील बाकीचे नष्ट होतील (शेवटी हाच डार्विन चा उत्क्रांती-सिद्धांत आहे ना... आपल्या संस्कृतात 'दैवो दुर्बलघातकः...)

याचे एक चांगले उदाहरण म्हणजे :) ही हास्यमुद्रा... १०० वर्षांपूर्वी हिचे अस्तित्व पण नव्हते पण आज ही केवढी सार्थ आहे... 'हास्यमुद्रा' किंवा 'स्मायली' म्हणून भापो (भावना पोहोचत... हाही किती सर्रास वापरला जातो) नाही. त्यामुळे वापरा वापरा आणि वापरा. बाकी सगळे स्वतःहून घडेल.

अजून एक उदाहरण...
"आजकाल नोकरी मिळणे कठीणच झालेय. विचार करतोय मस्त दुकान टाकावे अन् धंदा करावा. ते चितळे बघा, केवढा मोठा व्यापार आहे त्यांचा. केवढे कठीण असते ना हे शून्यातून निर्माण करणे. त्यासाठी बौद्धिक, शैक्षणिक, मानसिक , शारीरिक अशी परिपूर्ण पात्रताच हवी. खरंच, मानलं पाहिजे चितळ्यांना, जन्मजात प्रतिभा आहे व्यापाराची त्यांच्यात"

असा चार वेळा वापर झाला की 'प्रतिभे'ला पण नवे पैलू मिळतील. आणि पुन्हा एकदा सांगतो. माहितीजालावरची मराठी अजूनही बाल्यावस्थेत आहे. पैलू द्यायचे भाग्य लाभले आहे आपल्याला. (म्हणतात ना... लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.)

सद्ध्या इंग्रजी च्या अतिरेकी वापराने आपली भाषा हळू हळू नष्ट होत चालली आहे. मला हे टंकताना कितीतरी वेळा थांबावे लागतेय, योग्य पर्यायी शब्द आठवण्यासाठी कारण वापर नाही. पर्यायी शब्द असतील तर वापर करा. नसतील तर सुचवा आणि वापरा. न विचारता, बिनधास्त. पुढच्या मागच्या संदर्भातून भावना तर पोहोचतीलच. आणि आता माहितीजालावर जे नाही ते कालबाह्य होणार हे तर निश्चित आहे त्यामुळे मराठीचा हा पुनर्जन्मच आहे तो समृद्ध करा.

प्रमाणीकरण - शब्दांचे प्रमाणीकरण हा एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणी म्हणेल की परिमाण, मान, तीव्रता असे वेगवेगळे शब्द लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतील मग सगळा संभ्रम होईल. जर शब्द शास्त्रीय नसेल तर काहीच फरक पडत नाही. कारण एका शब्दाला बरेच अर्थ असतात आणि एका अर्थाला बरेच शब्द. त्यामुळे गोंधळण्याचे कारण नाही. आणि शब्द शास्त्रीय असला तर ती एक संज्ञा बनते, आणि अशा बहुतेक सगळ्या संज्ञा प्रमाणित आहेत त्या कळायला कदाचित सोप्या नसल्या तरी तशाच वापराव्यात. इंग्रजी मधे पण असेच आहे. मला सांगा 'प्रायमेटस्' म्हटल्यावर ही संज्ञा माहित नसेल तर काय बोडके कळते त्यातून? मग मराठी शब्दांकडून ती अपेक्षा कशाला. आणि बहुतेक शब्द हे अर्थपूर्णच आहेत. जसे बळ, शक्ती, विद्युतप्रवाह, ऊर्जा, सदिश... आणि तशीच तुलना केली तर इंग्रजी संज्ञांचा उगम ग्रीक, लॅटिन मध्ये सापडतो त्यामुळे आपल्याही संज्ञा या संस्कृतोद्भव असायला काही हरकत नसावी ना.

निष्कर्ष : एवढ्या मोठ्या चर्चेनंतर निष्कर्ष काढणेही चांगलेच.
१. मराठी आता पुन्हा बाल्यावस्थेत आहे. (पुनर्जन्म म्हणा)
२. शब्दांचा वापर हेच सूत्र आहे भाषा जपण्याचे.
३. सद्ध्याच्या काळी मराठीची वेगवान उत्क्रांती चालू आहे त्यामुळे आपापल्या परीने हातभार लावावा. शब्द वापरावेत वाटतील तसे, ते योग्य नसले तर स्वतःहून कालप्रवाहात त्या अर्थाने वापरले जाणार नाहीत.
४. संज्ञांचा वापर मात्र प्रमाणितच करावा शक्यतो. (आणि आपण मनोगतावर अशा संज्ञा आणतोच आहोत हळू हळू.)

 आपला
(मातृभाषाभक्त) ॐ