एक थोर संगीतकार. माणूस म्हणूनही तितकाच महान. १९४९ साली चाहत्यांच्या आग्रहावरून नशीब काढण्यासाठी तलत महमूद मुंबईला आले. त्यावेळी 'तुम्हाला माईकपुढे गाण्याचा अनुभव नाही' या कारणास्तव बऱ्याच निर्माते- संगीतकारांनी त्यांना संधी देणे नाकारले. या काळातच अनिलदांनी तलत महमूद यांना 'आरजू' साठी बोलावून घेतले. 'आरजू' मधील पहिलेच गाणे 'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल' प्रचंड लोकप्रिय झाले. तलत महमूद यांनी अनिल विश्वास यांचे हे ऋण आयुष्यभर मानले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर 'मेरी तो सारी दुनिया घूम फिर के अनिलदा के पास आती है' अनिल विश्वास यांनी तलतच्या या वाक्यावर म्हटले आहे, 'ये तो तलतका बडप्पन है, मैं तो एक बहाना हूं, जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते है'. पुढे तलत यांच्या आवाजातील नैसर्गिक कंपावर टीका सुरू होताच तलत महमूद यांनी तो कंप घालवायचे ठरवले. 'शुक्रिया ऐ प्यार तेरा' या गाण्याच्या वेळी त्यांनी तसा प्रयत्न केला तेंव्हा अनिल विश्वास यांनी तलत महमूद यांना त्यांच्या आवाजातील कंप हाच खरा मोठा गुण कसा आहे, ते पटवून दिले. याच मधुर कंपाच्या जोरावर तलत पुढे एक महान गायक झाले.
असंख्य गुणी कलाकारांप्रमाणे अनिल विश्वास यांची नंतरच्या काळात उपेक्षाच झाली. त्यांचे दिल्लीत निधन झाले तेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणीही तेथे उपस्थित नव्हते!
पायावर डोके ठेवावे अशी ही काही माणसे. यापैकी तलतच्या पायावर मी (कदाचित थोड्याशा भाबडेपणाने) खरोखर डोके ठेवले तेंव्हा काय वाटले हे शब्दांत सांगता येणार नाही!