तृणधान्यांचे पिष्टीकरण करणाऱ्या संयंत्राच्या ध्वनीप्रमाणे भासणारा एक ध्वनी महालात अखंड गुंजारव करू लागला

एकाद्या अदृष्य तंतूने बांधल्याप्रमाणे समांतर हालचाली करत त्या प्रतिमा अश्वशाळेच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागल्या. अमावस्येच्या रात्री कौशल्याने धनचौर्य करणाऱ्या शर्विलकाच्या कसबाने त्यांनी अश्वशाळेतले सहा अश्व रज्जूमुक्त केले. क्षणार्धात सहा अश्वस्वार वातवेगाने राजमहालाच्या प्रवेशद्वाराबाहेर पडले.
महत्प्रयासाने जागृतावस्था प्राप्त झालेल्या भ्रातृभजनाचे नेत्र कोशिकांतून बाहेर पडणार की काय असे वाटण्याइतपत विस्फारले. शेजारीच पडलेल्या मद्यार्काच्या रिकाम्या कुपीकडे त्याने किंचित तिरस्काराने कटाक्ष टाकला. पाहिले ते सत्य की स्वप्न या द्वंद्वात अडकून राहण्याचे त्याला आता प्रयोजन राहिले नव्हते. राजप्रासादाच्या बाहेरून विद्युतवेगाने नाहीशा होणाऱ्या एका अश्वाचा उन्मादध्वनी त्याच्या कानी आला. भ्रातृभजनाचे किंचित स्थूल शरीर अनावर कंपू लागले. वृक्षलतांवरील प्रकाशकीटक त्याच्या मिटत्या नयनांसमोर नर्तन करू लागले. आपणास मूर्छा येते आहे याची जाणीव होण्यापूर्वीच त्याच्या कुडीने धरणीसख्य पत्करले होते.    

आपली शब्दयोजना पाहून आम्ही वाचकजन स्तिमित झाले आहोत.

परंतु ही रंगत असलेली कथा वाचक उत्कंठेच्या परमोच्च बिंदूपाशी पोहोचताच खंडित करण्याच्या प्रयोजनाचे आकलन झाले नाही.  

ही कथा क्रमशः लिहिण्याचा मनोदय तर नाही?

(उत्कंठित)

हर्षवर्धन