घटोत्कच हा राक्षस होता व राक्षसांची मायावी शक्ती दिवस मावळू लागता, संध्याकाळ होता वाढू लागायची. घटोत्कच काय किंवा कौरवपक्षातील अलंबूस काय, संध्याकाळनंतर त्यांची संहारक शक्ती इतकी वाढायची की त्यांना आवरणे भल्या-भल्या महारथींनाही जमायचे नाही. म्हणूनच तर कवच-कुंडलांचा मोबदला देऊन इंद्राकडून मिळवलेले अमोघ अस्त्र कर्णास निरुपायाने घटोत्कचवधासाठी वापरावे लागले होते.
तिची स्मृतीही त्या घटोत्कचासारखीच आहे. संध्याकाळच्या कातरवेळी तिच्या त्या मायावी आठवणी इतक्या तीव्रतेने उफाळून येतात की सांगता सोय नाही. दिवस जगण्याच्या धबडग्यात कसातरी सरतो परंतु संध्याकाळ आणि रात्र ...
इथे केवळ राक्षसाची उपमा न वापरता घटोत्कचाचा विशेष उल्लेख करण्याचे कारण म्हणजे तो राक्षस असला तरी प्रिय होता. हीच ओळ "राक्षसांसम भासते ती सांजकाळी" अशीही लिहू शकलो असतो पण निव्वळ राक्षस या शब्दास सर्वसाधारणपणे एक नकारात्मक (नेगेटिव) छटा आहे . ती मला नको होती. तिच्या स्मृती छळत असल्या तरीही मला हव्या-हव्याशा आहेत, प्रिय आहेत. म्हणून घटोत्कच.