चर्चेत उशीरा सहभागी होण्याबद्दल क्षमस्व, माझा चमत्कारांवर वस्तुतः विश्वास नाही , परंतु मी माझ्या आजी कडून माझ्या खापरपणजीला -(आजींच्या सासूची सासू म्हणजे माझी खापरपणजी हे गणित बरोबर आहे का?)- अश्वत्थामा प्रसन्न झाला होता अशी आख्यायिका मी बऱ्याचदा ऐकल्याचे आठवले. आमचे घर नर्मदेच्या नव्हे पण गोदातीरी आहे. आख्यायिका अशी की माझ्या खापरपणजोबाला त्यांच्या सावत्र आईने काही पैसा अडका न देता कुटुंबा सहीत घराबाहेर काढले त्याच्या दुसऱ्या दिवशी एक अत्यंत गरीब भिकारी जखमी अवस्थेत माझ्या खापरपणजींकडे आला, खापरपणजोबांनी मोलमजुरी करून आणलेले तेलाचे बुधले माझ्या खापरपणजीने घरात अन्न नसतानाही त्या जखमी भिकाऱ्याच्या जखमेवर वापरून टाकले.
पण रात्री खापरपणजीस स्वप्नात अश्वत्थामा प्रसन्न झाला.. पाहते तर रात्री पुन्हा तेलाचे बुधले पुन्हा भरलेले, आणि तीच्या हयातीत ते तेलाचे बुधले कधी रिकामे नाही झाले. हि आख्यायिका माझ्या आजींना त्यांच्या सासूने स्वतःच्या सासू बद्दल सांगितलेली. सहसा सासू सुनांचे निगेटिव्ह नाते सर्वत्र दिसताना हि आख्यायिका अत्यंत प्रेमाने पुढच्या सुनेच्या पिढी कडे सोपवलीच नाही तर या कथेने प्रेरित माझ्या आजीने काँग्रेस कडून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला व जशी घडेल तशी स्वातंत्र्य उत्तर काळात समाजसेवा पण केली.
-विकिकर