वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या मंडळींच्या आत्मचरित्रांविषयी (चित्रपट -नाटकात काम करणाऱ्यांच्या आत्मचरित्रांसारखे) एक मसालेदार कुतूहल असते. मानवी शरीर, त्याचे रोग, शस्त्रक्रिया, मृत्यू याविषयी वाचायला लोकांना आवडते. 'क्लोरोफॉर्म' त्या काळात गाजले होतेच, पण के. ई. एम. एक सामान्य पुस्तक असूनही लोकप्रिय झाले. कुठल्याशा नेत्याच्या मांडीवरचे गळू कसे पंधरा मिनिटात कापून काढले आणि तो नेता दुसऱ्या दिवशी कसा दौऱ्यावर निघून गेला आणि कुठल्या स्मगलराच्या पोटात घुसलेला रामपुरी यशस्वीपणाने काढल्यावर तो आपले आयुष्यभर कसे ऋण मानत राहिला हे काही मुद्दाम लिहावे आणि वाचावे असे नाही, पण हे लिहिले आणि आवडीने वाचले जाते - मीही वाचतोच. वैद्यकीय व्यवसायातील दंभभेद ('पर्दाफाश' हा शब्द वापरण्याचा मोह निग्रहपूर्वक टाळून) हेही आता काही नवीन राहिले नाहीत. आत्नचरित्रांमध्ये एका माणसाच्या आयुष्याच्या कथेपेक्षा त्या त्या काळातील बदलत्या समाजजीवनातील नोंद हा भाग मला महत्त्वाचा वाटतो. डॉक्टर हा समाजातला एक जबाबदार घटक  मानला तर एका डॉक्टरच्या नजरेतून काळाच्या खळखळाटात कायकाय आणि कसेकसे बदलले गेले, हे वाचणे रंजक ठरेल. दुर्दैवाने बऱ्याचशा डॉक्टरांची आत्मचरित्रे ' मी आणि माझे आयुष्य ' या ठराविक साच्याचे असते. काही वेळा तर आपण आत्मचरित्र वाचतो आहोत, की त्या डॉक्टरच्या पेशंटसच्या केसपेपर्सची फाईल अशी शंका येण्याइतपत. असो.
रसग्रहण आवडले. 'जलांड' वगैरे शब्द तर खासच. (आणखी) एका मुद्द्यावर असहमती आहे, ती म्हणजे एका दिवसात अमुक इतक्या शस्त्रक्रिया करण्याच्या विक्रमाबाबतीत. कितीही कसबी शल्यचिकित्सक असला तरी त्याला मानवी मर्यादा आहेत. एका दिवसात जसजशा शस्त्रक्रिया होत जातील तसतशी त्या सर्जनची एकाग्रता (इथे पुन्हा महत्प्रयासाने 'सर्जनशीलता' हा शब्द टाळून) कमी होत जाणार हे उघड आहे.  'आपणही तसे किंवा त्याहून चांगले करू शकतो' हे सिद्ध करण्याच्या अट्टाहासापायी रुग्णांना अशा धोक्यांना सामोरे जावे लागणे कितपत योग्य आहे? पूर्वी एक डॉक्टर मोदी एका दिवसात मोतीबिंदूच्या हजार की कितीशा शस्त्रक्रिया करत असत. त्यांचे वर्णन वाचून अंगावर शहारा येतो. विक्रम कुणी आणि कसले करावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (तोंडात इडली कोंबलेल्या एका कळकट मुलाला एका जाहिरातीत 'आयडॉल' करून टाकले आहे) पण जिथे इतरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिथे अशी घिसाडघाई नसावी, असे वाटते.
असो. या पुस्तकपरीचयाबद्दल आभार. सध्या जी वाचली नाहीत तर फारसे काही बिघडणार नाही अशा पुस्तकांविषयी माहिती मिळण्याचे दिवस आहेत, असे दिसते. अर्थात हेही महत्त्वाचे आहेच म्हणा.