अगदी...अगदी... सकाळी आकाशवाणीवर लागणारी भक्तिगीते तर मनात एक वेगळीच भावना जागवून जायची त्या काळी. म्हणजे १५-२० वर्षांपूर्वी. त्या काळचे एक भक्तिगीत मला चांगलेच आठवत आहे.
वेद जयालागी नित्य वाखाणिती
तो हा वेदमूर्ती पांडुरंग, पांडुरंग...
हे गाणं गाणाऱ्या गायकाचे नाव आहे - भूमानंद बोगम. हे सर्वस्वी निराळे नाव मला त्या वेळी (आणि आजही) बेहद्द आवडायचे. भूमानंद बोगम ! काय भारी नाव आहे, असे मी मनातल्या मनात म्हणत असे. या गायकाचा आवाजही अतिशय छान. मला खूप आवडतो. हे नाव ऐकले की, भगनी कफनी घातलेली, करडी दाढी असलेली, काहीशी गुबगुबीत अशी व्यक्ती माझ्या डोळ्यांपुढे येत असे...बोगमसाहेबांनी आणखीही काही गाणी गाइलेली आहेत...मात्र ती मला आता आता धूसर धूसर आठवतात....बोगमसाहेबांनी काही गीतांना संगीतही दिलेले असावे, असे वाटते.
अन्य गायकांची आणखीही काही भक्तिगीते आठवतात....त्या काळी सतत लागणारी. ती अशी -
१) मंदिरातला सेवक सांगे भावभक्तीची फुले लुटा
पहाट झाली उठा उठा, पहाट झाली उठा उठा
२) जाग रे यादवा, ऊठ गोपालका
३) चल ऊठ रे मुकंदा, झाली पहाट झाली
४) दीपासंगे मंद जळतसे तव सेवेसी धूप
निराकार त्या ओंकाराचे मंगल दिव्य स्वरूप
५) कलश दुधाचा करी घेउनी कौसल्या माउली
ही गाणी सध्याही सकाळी आकाशवाणीवर लागतही असतील...पण आता एवढ्या पंचपंच उषःकाले झोपेतून उठणेही होत नाही आणि ती गाणी ऐकणेही होत नाही...ही भक्तिगीते आणि रात्रीच्या मिठीतून हलकेच बाहेर येऊ पाहणारी सावळी सावळी पहाट...ती सहा-साडेसहाची झुंजुमुंजू वेळ...पिंगळावेळेच्या बरीच नंतरची...अशा साऱ्या आठवणी मनात अधूनमधून गिरक्या घेत राहतात...
....................
....ही गाणी बाबा इतके काही छान म्हणतात कि हुबेहूब सुधीर फडके! या ओळीपर्यंतचा लेखांश फार आवडला. स्मृतिकातर करून गेला...
धन्यवाद.