नेमाड्यांनी (तशा सर्वच पुस्तकांत, पण विशेषतः बिढारमध्ये) गाणी आणि चांगदेव पाटीलचे एकाकी, अस्वस्थ जीवन यांचा फार सुरेख ताळमेळ घातला आहे. रुक्ष, असंस्कृत कुग्रामात येऊन पडलेल्या चांगदेवला उन्हाळ्याच्या रखरखीत रात्री रेडीओवरील गाणी एवढा एकच विरंगुळा असतो. डोक्याखाली उंच उशी घेऊन शेषशायी नारायणाप्रमाणे पडून राहिलेला चांगदेव आणि रेडीओवर न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आयेगी अशी मुबारक बेगम.
तंबूतला सिनेमा ही गावातली एकमेव करमणूक अशा एका गावठी खेड्यात माझे लहानपण गेले. तंबूतला सिनेमा रात्री सुरू व्हायच्या आधी तासभर लाऊडस्पीकरवर गाणी लागत असत. या गाण्यांची सुरुवात आणि शेवट दत्त दिगंबर दैवत माझे या पराडकरांच्या गाण्याने होत असे. मध्ये लागणारी काहीकाही गाणी आठवतात. नाच रे मन बख्खमा, ठुमक ठुमक बख्खम्मा, खुली पलकमें झूठा गुस्सा बंद पलकमें प्यार, जीना भी मुश्किल, मरना भी मुश्किल ...
हिंदी चित्रपटसंगीताच्या पलीकडे जाणं आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, हे कळाल्यानंतर बाकी आजपर्यंत त्याचे बोट सोडलेले नाही. होस्टेलचे दिवस, मेसचं घाणेरडं जेवण, वर्गात, कॉलेजात, शहरात जातीयतेचं गलिच्छ राजकारण, अनिश्चित, डळमळीत भविष्य... कुणीतरी पाठीवरून हात फिरवावा तशी गाण्यांची सोबत. जुल्फ जिद करके किसीने जो बनायी होगी, और भी गम की घटा मुखडे पे छायी होगी, आहटें जाग उठी, अश्क बहने लगें, जाने क्या क्या हमें लोग कहने लगे, उनका भी गम है, अपना भी गम है, अब दिल के बचने की उम्मीद कम है, ऐसेमें कहीं क्या कोई नहीं भूले से जो हमको याद करें, इक हल्कीसी मुसकान पे जो, सपनोंका जहां आबाद करें, समझे की साथ देगा किसीका सुहाना गम, खुली जो नजर तो देखा, तनहा खडे है हम....
नोकरीतल्या प्रवासाचे दिवस. अलाहाबाद. तुफानी पाऊस. भरभरून वाहणारी गंगा. सागर मिले कौनसे जलमें कोई जाने ना, वैसे तो तेरा रुप में तेरा जलवा रंग जमाये जब तू फिरे उम्मीदोंपर तेरा रंग समझ ना आये, वही चुनकर खामोशी, यूं चले जाये अकेले कहां, छुप छुप ऐसेमें कोई मधुर गीत गाये, गीतोंके बहाने छुपी बात होटोंपे आये...
नैनिताल. पहाट. प्रचंड थंडी. हमको मिली है आज ये घडीयां नसीबसे जी भर के देख लीजिये हम को करीबसे, वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे, वही कहेंगे कभी, हमने खुदखुशी कर ली, क्या भर लाऊ मैं जमुना से मटकी, लाज राख मोरे घूंगट पटकी, जब ना किसीने राह दिखायी, दिलसे इक आवाज ये आयी, कोई नगमा कहीं गूंजा, कहा दिलने ये तू आयी...
भटिंडा. रुक्ष, भकास उन्हाळा. महिनोनमहिने घराबाहेर राहिल्यानं येणारं वैफल्य. संध्याकाळचा गार वारा. बडे दिनोंके बाद, हम बेवतनोंको याद, वतनकी मिट्टी आयी है, सितारोंने मुंह फेरकर कहा अलविदा हमसफर, कुछ तो है आज जिसका हर चीजपर असर है, मस्त बहारोंका मौसम था, आंखसे आसू बहते थे, रही शिकस्त तो वो अपने नाम कर लूंगा...
गाणी अशी आयुष्यात मिसळून गेली आहेत.