आपला चर्चाविषय चांगला आहे. पण आपण शुद्धिचिकित्सक वापरलात तर चर्चाविषय वाचायला अधिक चांगला वाटेल असे वाटते.
बाकी मालिका रंजक आणि उत्सुकता ताणून धरणारी असली तरी बरीचशी अतर्क्य आणि अशाश्वत वाटते(या दोन्हीपैकी एखादे नावही शोभून दिसले असते नाही का! ) सांवादांवर मधूनमधून हिंदी भाषेचा प्रचंड प्रभाव जाणवतो आणि कानाला खटकतो. उदा. 'तू माझी मदत कर' किंवा 'तुम्ही माझ्या बरोबर हे काय करता आहात' किंवा 'तिथे खडूचे निशाण (खूण केली?) बनवले!' इ.
काही पात्रे कारणावाचूनच अत्यंत भोळसटपणा किंवा अत्यंत मूर्खपणा करत राहतात. शिवाय एक सनसनाटी घटना दाखवल्यानंतर पुढचे अनेक आठवडे जो काही पीळ मारला जातो त्याचा कंटाळा येतो. काही वेळेला चित्रपटाची रिळं उलटीपालटी व्हावीत तसे मालिकेचे भाग चुकीच्या क्रमाने दाखवले जातात की काय अशी शंका येते. अशा लहानसहान चुका आणि विसंगती सोडल्यास मालिका बरी आहे. सर्व कलाकारांचा अभिनय उल्लेखनीय आहे. विशेषतः नीलम शिर्केचा. बाकी सुलेखाची आई, कुसुम आत्या, परमेश्वर, यशवंत सरंजामे, तो कोकणातला रत्नाकर , नवीन पूनम वगैरे मंडळी उगाचच डोकं खातात.
या लोकांनी ही मालिका अशीच रटाळपणे पुढे ताणली तर एक दिवस त्यांचं टी आर पी तुटेल की काय अशी भीती वाटते. या मालिकेची वादळवाट होऊ नये एवढीच इच्छा आहे.
--अदिती