आता नावातच असंभव आहे म्हटल्यावर काहीही अशक्य दाखवले तरी चालते. मुळातच मालिका पुनर्जन्म नामक अंधश्रद्धेवर आधारित आहे. बरं पुनर्जन्म असतो असे मानले तरी माणसांची चेहरेपट्टी तशीच कशी? मालिकेमध्ये धरसोडपणा फार आहे. तो लहान मुलगा. त्याला काय काय दिसते.. तो त्यानुसार चित्रे काढतो.. आता मात्र शांत झालाय.

सुलेखाला अनेक भयानक (कु)विद्या ज्ञात आहेत. विशेषतः संमोहित करून काहीही करून घेणे. यामुळे संमोहन शास्त्राबाबत नाहक गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मर्जीशिवाय संमोहित करता येत नाही. पण एकदा `असंभव' म्हटलं की समजून जायचं . परकाया प्रवेश हे प्रकरण त्यात नवीनच घातलंय.

बाकी सर्व मालिकांप्रमाणेच इथेही खून पडणे अत्यावश्यक आहे. एखाद्या मालिकेमध्ये किमान एकतरी खून नसेल तर ती मालिका झी वाले संमत करीत नसावेत अशी एक शक्यता वाटते.(सारेगमप आणि एकापेक्षा एक मध्ये अजूनतरी खून पडलेला नाही हे आपले नशीब ) अशा मालिकेला खूप टी आर पी मिळतोय म्हणून की काय वहिनीसाहेब ही मालिकाही  अशाच अतर्क्य आणि हास्यास्पद कथानकाच्या वाटेवर चालली आहे. (एकाच वाहिनीच्या मालिकांमध्ये  ही  अशी स्पर्धा? )

बाकी अभिनय बहुतेक सर्वानी चांगला केला आहे हे मान्य करायला हवे.

इतर हिंदी वाहिन्यांवर भयमालिका आहेत.. त्यात भूत, पिशाच , जादूटोणा, अघोरी विद्या असे प्रकार दाखवले जातात. पण त्या मालिका उघडपणे  हॉरर म्हणूनच दाखवल्या जातात.

असो.. म्हाराष्ट्र सरकारने जर संकल्पित अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायदा संमत केला तर अशा मालिकांचे प्रसारण नक्कीच कठीण होऊन बसेल.

असंभव सुरूवातीला बरी वाटली म्हणून पाहत होतो.. आता मी तरी या मालिकेच्या टीआरपी मध्ये सामील नाही, म्हणजे बघत नाही.मला वाटते भरपूर पारितोषिकं मिळवुन शेवटी हिची पण `वाट'  वादळी होणार!  आणि तसे होणे असंभव मुळीच वाटणार नाही.