आमच्या वाड्याशेजारीही मंगल कार्यालय होतं, त्यामुळे मुंगळा मुंगळा आणि भोली सूरत दिले के खोटे ही गाणी मी कित्येक वर्षे केवळ बँडवरच ऐकली होती. गाण्यांतला एकही शब्द अजिबात माहीत नव्हता, मात्र भोली सूरत हे पूर्ण गाणं ट ण टँ टँ टॅ णॅ णॅ टॅणणॅ, ट ण णण णॅ णॅ,  टणरणणर णॅ णॅ, टणरणणर णॅ, टटर णटर णॅ असं म्हणता येत असे. ते मी पेटीवरही बसवलं होतं.
गणेशोत्सवात पहाटे साडेपाचाला गणपतीच्या गाण्यांना सुरुवात व्हायची. मात्र पहिलं गाणं 'तुज मागतो मी आता' लागलं की हसू यायचं, वाटायचं की उठल्यापासून ह्यांची मागायला सुरुवात झाली!! 
रविवारी सकाळी आमच्याकडच्या जुन्या रेडियोवर वावा सिलोन लावायचे ती गाणी ऐकत झोपेतून जाग येताना फार छान वाटायचे. नवीनठेका-ठोका गाणी मला कधीच विशेष आवडली नाहीत.