आजच दुपारी एका मराठी वाहिनीवर झीट येईल असा कार्यक्रम पाहायला मिळाला ! विषय होता - आपण मराठी चित्रपट पाहता का ? ( का पाहत नाही ? पाहिले पाहिजेत !!!)
महाविद्यालयाचे आवार, बाजारपेठ, रस्ता अशा अनेक ठिकाणी फिरत एक युवती हातात दांडके (ध्वनिवर्धक) घेऊन काही तरुण-तरुणींना प्रश्न विचारीत होती. प्रश्न होते - मराठी चित्रपट तुम्ही पाहता का ? कोणता नायक आवडतो ? कोणती नायिका आवडते ? (अनेकांना जी नायिका आवडते, तिचे नावच आठवत नसायचे...ती हो, अमूक-तमूकची (संबंधित प्रसिद्ध नटाचे नाव) बायको, असे उत्तर यायचे.) अलीकडच्या एखाद्या चित्रपटातील (अर्थातच मराठी हां ) गाणे म्हणून, गुणगुणून दाखवा...वगैरे वगैरे...
मराठी चित्रपटच पाहत नाही असे उत्तर समोरून आले रे आले की, ही युवती संबंधिताला शिक्षा फर्मावत होती. नुसती फर्मावतच नव्हती, तर लगेचच्या लगेच ही शिक्षा भोगावीही लागत होती. कान पक़डून उठाबशा काढणे...मराठी चित्रपट पाहत नसल्याबद्दल ताला-सुरात सॉरी सॉरी (सॉरी सॉरी मात्र इंग्रजीत हां !) म्हणणे...इथून पुढे मी मराठी चित्रपट पाहत जाईन, तेही चित्रपटगृहात; नव्हे तर थेट थेट्रात जाऊन पाहीन अशी प्रतिज्ञा (शाळेत नाही का, खांद्याच्या उंचीला समांतर असा हात पालथ्याने पुढे करून हिंदमातेची (थिएटर नाही हो ! आपला प्राणप्रिय भारत देश) प्रतिज्ञा म्हटली जायची, अगदी तशीच!) करणे...झाडाला फेऱ्या मारायला लावून, सॉ़री, मी यापुढे मराठी चित्रपट पाहत जाईन, असे म्हणायला लावणे, अशा या शिक्षा होत्या....सारे काही ठरवून केलेले...नाटक ! मराठी चित्रपटाच्या उन्नतीसाठी असे नाटक करण्याची वेळ खरोखरच आलेली आहे काय ? गंमत वाटली. दुःखही झाले.
.................
श्यामची आई हा मराठीतील पहिला राष्ट्रपतिपदक विजेता चित्रपट. सानेगुरुजींची लेखणीच इतकी ताकदवान (आणि आचार्य अत्रे यांचे दिग्दर्शनही) होती की बस्स !काळजात घर करून बसणे म्हणजे काय, हे या चित्रपटावरून समजावे...सारेच अत्युत्तम. कसदार, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, ठाई ठाई प्रतिभेची चमक दाखविणारे..
प्रभात च्या संत तुकारामने (माफ करा, फारच मागे मागे जावे लागत आहे मला.) त्या काळी मराठी-अमराठीच्या सीमा अगदी सहजासहजी ओलांडल्या होत्या. आज काढा ना असे चित्रपट . मराठीच काय, अमराठी माणसेही लोटतील चित्रपटगृहांकडे. कोणतीही नाटके न करावी लागता !
श्यामची आई काय किंवा संत तुकाराम काय हे चित्रपट चालावेत म्हणून त्यांना अशा नाटकांच्या कुबड्यांची गरज कधीच भासली नव्हती. आज पैसा आहे, कलाकार आहेत, तंत्रज्ञान आहे. सर्व काही आहे...पण प्रतिभा ? (कविवर्य़ केशवसुतांची क्षमा मागून असेच म्हणतो की -प्रतिभा मिळेल काहो बाजारी ? प्रतिभा मिळेल का हो शेजारी ?)
हां, ते नेहमीचे वाक्य म्हणायचे राहिलेच....प्रतिभेच्या बाबतीत काही सन्मानीय अपवाद आहेतही...नाही असे नाही. पण किती ? असो...
.................
खरेच मराठीवर (भाषा म्हणून, साहित्य म्हणून, चित्रपट म्हणून) एवढी दीनवाणी वेळ सध्या आली आहे ? प्रेम- मग ते कुणावरही असो-देशावर, भाषेवर की व्यक्तीवर- असे मारून-मुटकून करायला लावता येते ? हजारो मैल दूर राहणाऱ्या समस्त मराठीजनांच्या मनात जर मराठीविषयी प्रेम नसते, मराठीतून(च) व्यक्त होण्याची आंच जर त्यांना नसती, तर जी काही मराठी संकेतस्थळे सध्या अस्तित्वात आहेत, ती अशी आणि एवढी भरभरून वाहिलीच नसती....(इंग्रजी संकेतस्थळे काय कमी आहेत काय ?) अर्थात, ही खूपच चांगली गोष्ट आहे. परदेशांत राहून ही मराठी माणसे (त्यांच्यापुरती का होईना) मराठी भाषा अशी टिकवून ठेवत आहेत. आपल्या मायबोलीवरील प्रेमाचा डंका पिटण्यासाठी, मराठीवरील प्रेम जाहीरपणे प्रकट करण्यासाठी, ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अशा कोणत्याही बेगडी प्रकारांची गरज भासत नाही. आपल्या देशापासून वर्षानुवर्षे दूर राहणाऱ्या मराठीजनांना कोण शिकवते मायबोलीवर प्रेम करायला ? अर्थातच त्यांचे हृदय !
...पण सध्या भाषा असो, साहित्य असो की चित्रपट (ते क्षेत्र तर बोलून-चालून दिखाऊच !) सगळीकडेच सवंगपणा, उथळपणा आला आहे....मग असा खळखळाट होतच राहणार...!
..........
संग्राहक,
तुमच्या विषयाला धरून माझे हे बोलणे झाले नसेलही, पण व्यक्त करावेसे वाटले म्हणून करून टाकले...गोड मानून घ्या !!!धन्यवाद.