षण्मिती चित्रपटाविषयी आतरजालावर वाचल्यावर हे नामाभिधान चुकीचे आहे असे वाटते. कारण आपल्या पंचेद्रियापैकी दृष्टी आणि श्रवणसुखाचा लाभ तर आजच्या द्विमिती आणि त्रिमिती चित्रपटात आपण घेतच असतो. म्हणून त्यांना आपण चतुर्मिती किंवा पंचमिती चित्रपट म्हणत नाही.तसे असेल तर त्रिमिती चित्रपटात स्पर्श आणि गंध या दोन मिती ( याला मिती समजायचे की नाही?) मिळवल्या तर ते  सप्तमिती चित्रपट म्हणता येइल.  मी वारी -१४ मध्ये ज्या चतुर्मिती चित्रपटाचा उल्लेख केला आहे त्यात पाण्याचा शिडकावा पाऊस आला असता अंगावर पडतो म्हणून त्याला चतुर्मिती म्हणणे कितपत योग्य ठरेल  अशी शंका  मला अजूनही येते. आंतर्जालावरील वर्णनात हा चित्रपट तुमच्या सहा ज्ञानेंद्रियांना (will capture your six senses) रमवेल असे म्हटले आहे्  तेही चुकीचे आहे कारण ज्ञानेंद्रिये पाचच आहेत. त्यातील रसनेंद्रियाची हौसही हा चित्रपट भागवेल असे म्हणता येत नाही, त्यासाठी आपल्यालाच भेळ किंवा आइस्क्रीम सोबत घेऊन जावे लागेल किंवा   पहायला येणाऱ्यांना ते मोफत पुरवण्यात आले तरी त्यामुळे चित्रपटाला षण्मिती चित्रपट म्हणता येणार नाही. आज त्रिमिती चित्रपट अस्तित्वात असून बव्हंश द्विमिती चित्रपटच चालतात तसेच या षण्मिती चित्रपटांचे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.