'रोहिणी,

आपल्या या लेखातून आपण वैयक्तीक अनुभव सांगितला असला तरी माझा अनुभव यापेक्षा फारसा वेगळा नाही. त्यामुळे लेख मनाला खूप भिडला आणि बालपणीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. 

      माझ्या बालपणी बहुतेक वेळा आमच्या घरी विविधभारतीवरील सांजधारा कार्यक्रम ऐकला जात असे. असे. त्यावेळी सांजधाराची वेळ ५:३० ची असायची. आता ती ६:१५ केली आहे. त्यामुळे मला भावगीते कानावर पडली की संध्याकाळ झाल्या सारखा भास होतो. येरे घना,संधीकाली या अशा, सावर रे सावर रे या सारखी गाणी लागली की, का कोण जाणे पण सायंकालीन माहौल तयार होतो.

     शालेय अभ्यासात मराठीला अनेक कविता होत्या.त्यातील अनेक कविता नामवंत संगीतकारांनी संगीतबद्द करून  प्रतिथयश गायकांनी गायल्याही होत्या.किलबिल किलबिल पक्षी बोलती,टपटप टाकीत टापा,आनंदी आनंद गडे, नववधू प्रिया मी बावरते,प्रेमस्वरूप आई,जनपळभर म्हणतील हाय हाय, घाल घाल पिंगा वाऱ्या, हे राष्ट्र देवतांचे, उषःकाल होता होता,ने मजसी ने, पसायदान आणि अशा कितीतरी कविता  रेडियोवर गाण्यांच्या रूपात कानावर पडत आणि अजूनही पडतात. पण शाळेत त्यांचे गायन बहुतेकदा एकाच टीपीकल चालीवर होत असे . या झोपडीत माझ्या. या चालीवर. मराठीच्या तासाला ही गाणी शाळेत का ऐकवली जात नाहीत असा प्रश्न मला तेव्हा नेहमी पडायचा. शालेय जीवनात मराठी विषयाबद्दल सर्वस्वी अप्रिती निर्माण करण्य़ाचे काम कुणी केले असेल तर या कवितांनी आणि त्यावरील संदर्भासहित स्पष्टिकरण या प्रश्नांनी. (हे वाक्य पुलं कडून प्रेरित) 


   आमच्या घरात एक २ इन १ होता. त्याच्यात एक दोष असा होता की त्याच्या मोटरला लावलेला रबरबॅण्ड मूळ संचातला नसल्याने त्यावर बाहेरच्या ध्वनीफीती खूप जलद गतीने वाजत. दुरूस्त करण्य़ाचा प्रयत्न करूनही मोटरची गती नियंत्रित होत नव्हती.त्यामुळे गाणी नीटपणे ऐकू यावीत म्हणून रेडियोवर लागणारी गाणी त्याच २ इन १ मध्ये ध्वनीमुद्रित करणे हाच एक उपाय होता. मला आवडत्या मराठी गाण्यांची ध्वनीफित बनवायची होती. एक नवी कोरी ध्वनीफीत घेतली. विविधभारती, मुंबई ब (आताची अस्मिता वाहिनी) , पुणे अशा आकाशवाणीच्या केंद्रांवरून बरीचशी नेहमीची यशस्वी गाणी मिळत गेली.मनाच्या धुंदीत, ही चाल तुरूतुरू इत्यादि. पण मला आशा भोसले यांचे सुपुत्र हेमंत भोसले यांनी स्वरबद्ध केलेली ३ मराठी गाणी हवी होती. शारद सुंदर, जा जा जा रे आणि मी ही अशी. एका गाण्यात  पाश्चात्य सुरावटी आणि दुसरीकडे शास्त्रीय संगीतावरील सुंदर रचना. तर जा जा जा रे च्या सुरूवातीला स्पॅनिश गिटारचे झणत्कार. आकाशवाणीवर गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला की निवेदकाचे "गीत शांता शेळके, संगीत हेमंत भोसले व गायिका आशा भोसले" हे शब्द ऐकण्यासाठी मी कान टवकारून बसे. शारद सुंदर आणि जा जा जा रे ही गाणी मिळाली. पण मी ही अशी काही मिळेना. अखेर एकदा आपली आवड मध्ये ते लागले. ध्वनीमुद्रित करायला बटण दाबले. पहिले कडवे पार पडले..दुसऱ्या कडव्याला भरे कंप देही, भरे कंप देही ,भरे कंप देही ,भरे कंप देही ..कंप काही संपेना...झालं संपलंच..आकाशवाणी केंद्राची ध्वनीमुद्रिका अडकून बसली होती. काही अपरिहार्य कारणामुळे गाणे पूर्ण ऐकवू शकत नाही सांगून पुढचे गाणॆ लागले. त्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी ते गाणे एकदाचे लागले आणि मला ते ध्वनीमुद्रित करता आले.

आज एमपी३ प्लेअर आहेत. निळ्या दाताने तर भ्रमणध्वनीसंचातील गाण्यांची देवाणघेवाण सहज होऊ शकतेय.पण तेव्हाची मजा काही औरच होती. रेडियोवर पुढचे गाणे कोणते लागणार हे माहित नसल्याने पुढील गाण्याबद्दल उत्सुकता असते.एफ एम गोल्ड, एफ़ एम रेनबो वरील वरील जुनी मराठी /हिंदी गाणी ऐकायला म्हनुनच आवडतात.

या निमित्ताने एफ़ एम रेकॉर्डर  असलेले भ्रमणध्वनीसंच कसे असतात या बद्दल माहिती वा अनुभव असल्यास जरूर कळवावे. एक चांगला संच घेण्याचा विचार आहे.

आपला

रेडियो प्रेमी

मंदार