डार्विनचा सिद्धांत सांगतो की या प्राण्यांनी स्वतःला निसर्गाशी जुळवून घेतले व आवश्यक बदल स्वतःमध्ये घडवून आणले. पण ते कसे? ते काय त्यांच्या मर्जीनुसार घडवता येणे शक्य होते? मानवा सारखा एवढा विचार करणारा प्राणी. माणसाला अंधारात दिसत नाही. उत्क्रांतीच्या टप्प्यावर माणसाला वाटले असेलच ना की रात्रीचे दिसले तर किती बरे होईल! पण माणसाची तीव्र इच्छा असूनही रात्रदृष्टी मानवास निसर्गाकडून आजतागायत मिळालेली नाही. थोडक्यात हे शारिरीक बदलांचे नियंत्रण निसर्गाकडेच आहे. निसर्ग हा बदल ज्याला म्युटेशन म्हणतात तो कसा घडवून आणतो? विज्ञान म्हणते हे बदल आपोआप घडुन येतात.या आपोआपला काय अर्थ आहे? यदृच्छा म्हणजे तरी नेमके काय?
बदलांचे नियंत्रण केवळ निसर्गाकडे नाही. किमान तुम्ही दिलेल्या उदाहरणात तरी. जर माणसाला रात्रीचे दिसायला हवे असेल तर असा कायदा करायला हवा की रात्री (किंवा अमुक इतक्या कँडेला प्रकाशात) बघू शकणाऱ्या, आकडे-अक्षरे वाचू शकणाऱ्या स्त्रीपुरुषांनाच पुनरुत्पादनाचा अधिकार आहे. बाकी लोकांना मुले होता कामा नयेत. असे पाचेक हजार वर्षे केले की जवळपास सगळी मानवी प्रजा तितक्या कमी प्रकाशात बघणारी होईल.
डार्विनचा सिद्धांत असे सांगत नाही की प्राण्यांनी स्वतःहून आपल्यामध्ये आवश्यक बदल घडवून आणले किंवा निसर्गाने त्यांच्यात आवश्यक बदल घडवून आणले. निसर्ग कसल्याही प्रकारचे बदल, व्यवस्था वगैरे 'करत' नसतो. ज्यांच्यात थोडेफार बदल आपोआप घडले होते, जे त्या त्या भोवतालाच्या परिस्थितीत टिकून राहू शकले ते टिकले आणि त्यांची प्रजा वाढली इतकेच.
सजीव व निर्जीवातला फरक सुद्धा मानण्यावर आहे. पण याचे विवेचन करायचे म्हणजे मोठा लेखच लिहावा लागेल.