हा वाद प्राचीन आहे. कोणतीही भाषा बोलताना / लिहिताना त्या भाषेच्या शुद्ध असण्याविषयी आग्रही असावे, यात काहीच नाकारण्यासारखे नाही. उदाहरणार्थ, मराठी ही माझी मातृभाषा आहे, मी मराठी बऱ्यापैकी बोलू आणि लिहू शकतो आणि एखाद्या भाषिकाला आपल्या मातृभाषेविषयी जितका अभिमान असावा  तितका मलाही आहे. मराठी शक्य तितक्या शुद्ध स्वरुपात वापरली जावी याविषयीही मी जितका असायला पाहिजे तितका आग्रही आहे. प्रश्न असा आहे की मी चार लोकांत वावरताना की बोर्डला कळपट असे म्हणून या अभिमानात भर कशी पडते? कंप्युटरचा शोध ज्या देशात लागला तिथे की बोर्ड हे नाव देण्यात आले. हे नाव इंग्रजीत आहे आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. त्यामुळे मी माझ्या परदेशी किंवा अमराठी सहकाऱ्याशी बोलताना की बोर्ड असे म्हणालो, तरच त्याला ते कळणार. मग मी कळपट असे म्हणण्याचा अट्टाहास का धरावा? की याला पर्याय म्हणजे मी मराठी कळणाऱ्यांच्यात वावरताना कळपट म्हणावे व इतरांच्यात की बोर्ड म्हणावे? पण हे सगळे कशासाठी? '  कम्युनिकेशन इज अ प्रोसेस बाय विच मीनिंग्ज आर एक्स्चेंजड बिटवीन पीपल  थ्रू दी यूज ऑफ अ कॉमन सेट ऑफ सिंबॉल्स' या व्याख्येनुसार 'की बोर्ड' हाच तो  कॉमन सेट ऑफ सिंबॉल्स. मी अट्टाहासाने कळपट म्हणत राहिलो तर माझा मराठी अहंकार कुरवाळला जाईल हे खरे, पण माझे म्हणणे दुर्बोध होईल त्याचे काय?
आता राहतो प्रश्न मौन सहमतीचा. आपल्याला जे पटत नाही त्यावर मूक राहणे ही एक जीवनावश्यक झालेली चतुर कला आहे. ताबडतोब लोकप्रिय होण्याचा गुरुमंत्रच म्हणाना. ते ज्याला जमले ते बघताबघता 'माशाल्ला, सुभानल्ला' पती होतात. ज्यांना ते जमत नाही ते आमच्यासारखे टीकेचे धनी होतात. असो. मराठीत इंग्रजी शब्द घुसडण्याचे पातक करून 'नो रिग्रेटस' म्हणतो.