केवळ रसायनशास्त्रच नव्हे तर भौतिकशास्त्र, जीवशास्त्र ह्या सर्व शास्त्रविषयांचे प्राथमिक व माध्यमिक पातळी वगळता शिक्षण हे इंग्लिशमधूनच होते. प्राथमिक स्तरावर या विषयांशी करून दिलेली ओळख ही सोप्या भाषेत असावी ते मराठीत करणे शक्य आहे. मात्र अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायचे म्हटले तरी इंग्लिशला पर्याय नाही.
पण माध्यमिक पातळीवरील पाठ्यपुस्तकात असणारे मराठी शब्द हे अवघड आहेत. त्यापेक्षा अडचणीची गोष्ट अशी की उच्चमाध्यमिक पातळीवर शिक्षण घेण्यासाठी गेल्यावर हेच सर्व शब्द आधी इंग्लिशमध्ये काय आहेत हे समजून घ्यावे लागते. तरच वर्गात बसणे व नंतर परीक्षेला पेपरात लिहिणे शक्य होते. चंचुपात्र, नळी हे शब्द तसे तुलनेने सोपे आहेत. पण संधिपाद, त्वरण, गुरुत्वाकर्षण, प्रमापी, द्विआघाती, चतुराघाती वगैरे शब्द रोजच्या व्यवहारात अजिबात वापरले जात नाहीत. साधी गाडी जोरात चालवायची म्हटली तरी ऍक्सीलरेट कर वगैरे वाक्यं अगदी ग्रामीण भागातही सहज वापरली जातात. पाना (स्पाईनर), वायसर (वॉशर), ग्रॅविटी, टू-स्ट्रोक, फोर-स्ट्रोक, ब्रेक, लिव्हर, क्लच, गियर असे अनेक रोजच्या वापरातले मूळचे इंग्लिश शब्द शब्द सोडून त्याला पर्यायी अवघड शब्द पुस्तकात वापरल्याने तो विषय सोपा असूनही अवघड वाटू लागतो असा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे.
संपूर्णपणे मराठी शिक्षण बंद करून इंग्लिशमध्ये सुरू करणे हा त्यावर उपाय नाही. जर वरील शब्द आपण रोजच्या व्यवहारात स्वीकारले आहेत तर मग पुस्तकात ते तसेच का वापरू नयेत?