मी प्रतिशब्द शोधणे/सुचवणे/वापरणे हे गेली निदान तीस बत्तीस वर्षे हौशीने करीत आहे. ह्याबाबतीत जमलेल्या माझ्या अनुभवावरून मी काही अनुमाने काढलेली आहेत.

केवळ प्रतिशब्द शोधणे आणि प्रतिशब्दांना विरोध करणे हे करण्याऐवजी त्या त्या विषयावर लेखन करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. ते ते लेखन करताना काय काय शब्द हवे आहेत/नकोत त्यांचा(च) विचार करावा. मनोगतावर अनेकांनी ह्यापूर्वी असे करून उत्तम लेखन  केलेले आहे.

एखाद्या/दीने सुचवलेला शब्द कसा चांगला/वाईट आहे हे ठरवण्यात वेळ/श्रम घालवण्याऐवजी आपण आपल्याला चांगले वाटणारे शब्द/प्रतिशब्द वापरून त्या त्या विषयावर अधिकाधिक लेखन करीत जावे. अधिकाधिक वापराने शब्द रुळतातच.

आपण लेखन करीत असताना प्रतिशब्द नसेल / आपल्याला प्रतिशब्द सुचत नसेल  आणि कोणी प्रतिशब्द सुचवले तर 'त्यातल्या त्यात' त्यावेळी चांगले वाटणारे / मराठीत एकाहून अधिक प्रकारे सहज वापरता येतील असे प्रतिशब्द वापरावे. न आवडलेल्या शब्दांना नाकारण्याऐवजी अधिक चांगला शब्द सुचेपर्यंत उपलब्ध असलेला प्रतिशब्द वापरणे. (म्हणजे 'सर्वोत्तम / सर्वसामर्थ्यशाली शब्द मिळेपर्यंत प्रतिशब्द वापरणारच नाही' ह्याऐवजी 'जिथे जिथे किंचितही शक्य असेल तेथे तेथे प्रतिशब्द वापरीन आणि अधिक चांगल्या शब्दांचा शोध घेत राहीन', असा विचार करावा.)

इतरांनी सुचवलेले पण मला न आवडलेले/न पटलेले पण अधिक चांगले पर्याय न सापडलेले अनेक प्रतिशब्द मी वापरत आहे आणि अधिक चांगल्या प्रतिशब्दांचा शोधही चालूच आहे. आपल्याला प्रतिस्पर्धी लेखकापेक्षा आपले वर्चस्व/श्रेष्ठत्व सिद्ध करायचे नसून इतरभाषिक शब्दांना प्रतिशब्द शोधायचे /वापरायचे आहेत, हे मी सतत मनात आणत आहे.

नुसते प्रतिशब्द शोधून सोडून न देता ते गुंफून अधिकाधिक लेखन केले गेले पाहिजे. नवे सुचलेले प्रतिशब्द वापरण्यासाठी केवळ नेहमीच्या जीवनातल्या सुखदुःखांवर न लिहिता  वैज्ञानिक विषयांवर लिहिताना / विनोदी लिहिताना / कवितेत लिहिताना ते वापरीत गेल्यास वाचणाऱ्याच्या मनाची पकड चटकन घेतात आणि रुळण्यास मदत होते, हा माझा अनुभव आहे.  (काव्यशास्त्रविनोदेन प्रसिद्ध शब्दो भवेत् असे काहीतरी म्हणायला हवे!)

एकाच शब्दाला अनेक प्रतिशब्द सुच(व)लेले असतील तर 'हा नको' ऐवजी 'सगळेच हवे - वेगवेगळ्या प्रकारे ते वापरता येतील' असा संग्रही दृष्टिकोन ठेवावा. (उदा. निस्सीम आणि बेसुमार. तिचे नवऱ्यावर निस्सीम प्रेम आहे. तिचा खर्च बेसुमार आहे. असे काहीसे आपण वापरतो तसे ... )

वजाबाकीच्या विचाराऐवजी बेरजेचा विचार करणे हे सर्वात चांगले म्हणतात ते असे.