चर्चा थोडीशी वेगळ्या दिशेने चालली आहे असे वाटतेय. मला वाटतं की मूळ मुद्दा हा होता की कशासाठी प्रतिशब्द वापरावेत आणि कशासाठी वापरू नयेत.
चर्चौघात (गंगौघाच्या धर्तीवर... आणि संस्कृतप्रचुर शब्दांना होत असलेला विरोध पाहता, कंड ह्या शब्दाशी यमक साधणाऱ्या अवयवात कंड म्हणून!) एक मुद्दा मांडला गेला होता तो म्हणजे इंग्लिश शब्दांचे मराठीकरण व्हावे. पण हे मराठीकरण करताना थोडेसे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.
रेस्तराँ ह्या शब्दाच्या उच्चाराचे इंग्लिशीकरण होऊन रेस्टॉरंट हा शब्द तयार झाला. तर राँदेवू ह्या फ्रेंच शब्दाचा उच्चार न बदलता तो इंग्लिशमध्ये रूढ झाला. पण भाषा ही जरी उत्क्रांत होत असली तरी तिला नियम असणे काही कारणांसाठी गरजेचे असते. इंग्लिशीकरणाच्या नादात सर्वच शब्दांचे इंग्लिशीकरण करणे अत्यंत हास्यास्पद ठरेल. डोंट डरोफाय सिंप्ली करोफाय म्हणणे म्हणजे इंग्लिश बोलणे असा एक काळ मध्ये येऊन गेला आणि केवळ इंग्लिश पंडितांच्याच नव्हे तर इंग्लिश भाषेविषयी (एक उत्क्रांतीशील भाषा म्हणून) आदर आणि प्रेम असणाऱ्या सामान्य लोकांच्याही उपहासाचा विषय बनून गेला. इंग्लिशीकरण करावे पण ते किती? ह्या प्रश्नाला एकच उत्तर आहे ते म्हणजे तारतम्य राखून. मला वाटते की मराठीकरणाच्या बाबतीतही हेच लागू होते. परभाषीय शब्दांचे मराठीकरण हा उपहासाचा आणि हास्यास्पद विषय बनू नये.
नाहीतरी हल्ली असे मराठीकरण करणे हे 'स्टेटस'चे लक्षण समजले जाते. (माझी एक मैत्रीण परवा म्हणाली, 'व्हेसल मधून मिल्क ग्लासमध्ये पोअर करताना स्पिल झालं. ब्रेकफास्ट तर नाहीच झाला पण ते सगळं क्लीन करता करता ऑफिसला खूप लेऽट झालं.' (मी मनातल्या मनात म्हटलं, बरंच चांगलं वाक्य होतं. नाहीतर 'व्हेसलातून मिल्क ग्लासात पोअरताना स्पिललं. ब्रेकफास्ट टेकणं (take) राहू दे, पण ते सगळं क्लीनता क्लीनता ऑफिसला लेऽटले...'))
माझं म्हणणं एवढंच की शब्द (मूळ इंग्लिश अथवा मराठी प्रतिशब्द) वापरताना तारतम्य बाळगल्यास आपलं हसं होत नाही. आणि कोणत्याही गोष्टीचा आग्रह चांगला, दुराग्रह बरा नव्हे! प्रतिशब्द जितके सहज आणि नेहमी वापरू तितके ते अधिक रुळतात.
अजूनही सविस्तर लिहायचंय पण वेळेअभावी आत्ता शक्य नाहीये.
कळावे,
- चैत रे चैत.