दिवाळी अंकाच्या प्रकाशनाबाबत माझा दृष्टीकोण असा -
जालावर प्रकाशित होणाऱ्या लेखनाचे संपादन होऊ नये असे काही तत्त्व असावे असे माझ्या माहितीत नाही. मनोगताच्या सदस्यांपैकी काही संपादक मंडळात असणार आणि त्यांच्यात आणि इतर सदस्यांमध्ये फार काही गुणात्मक फरक नसावा हे मान्य. मात्र इच्छा, वेळ आणि क्षमता ह्या तिन्ही गोष्टींची संपादक मंडळाला गरज आहे. एकाच सदस्यव्यक्तीकडे तिन्ही गोष्टी असतील असे नाही, म्हणूनच एक संपादक असण्यापेक्षा संपादक मंडळ असणे केव्हाही योग्य. सर्व संपादक मंडळींकडे मिळून ह्या तिन्ही गोष्टी पुरेश्या प्रमाणात असाव्यात असे गृहीत धरणे शक्य असावे. मनोगतावर लिहिणारे कोणी व्यवसायाने वा अनुभवाने संपादक नाहीत. आपापला उद्योग सांभाळून लोक लेखन करतात. त्यातील काहींच्या लेखनाचा दर्जा इतरांपेक्षा वरचढ असतो, काहींच्या क्षमता जास्त असतात, काहींना मुबलक वेळ असतो, काहींची खटपट करण्याची, प्रयत्न करण्याची इच्छा असते. त्यामुळे आंतरजालावरील दिवाळी अंकाच्या संपादक मंडळींमध्ये गुणात्मक फरकापेक्षा वेळ आणि इच्छेची उपलब्धता ह्या गोष्टींमधील फरक जास्त महत्त्वाचा ठरला तर त्यात मला काही वावगे दिसत नाही.
मनोगताच्या सदस्यांनी माझ्या आठवणीनुसार किमान काही वेळा मनोगतावरील लेखनाचा एखादा विशेषांक वा दिवाळी अंक असावा अशी इच्छा व्यक्त केली होती. काही सदस्यांनी ह्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी कष्ट घेतले ही मला कौतुकाची बाब वाटते. ज्यांना गुणात्मक फरक नसलेल्या संपादक मंडळाकडून स्वतःचे लेखन स्वीकारले वा नाकारले जाणे योग्य वाटत नाही त्यांना अंकासाठी लेखन न पाठवण्याची मुभा आहेच की. लेखन पाठवण्याचे आवाहन आहे, सक्ती नव्हे.
'मागच्या वर्षी दिवाळी अंकासाठी संपादक म्हणून काम करणाऱ्या कोणीच या वर्षी प्रत्यक्ष किंवा पडद्या आडून संपादक म्हणून काम करू नये'ही मागणी मला योग्य वाटत नाही. इथे कोणी संपादनाचा फार अनुभव असलेले नाहीत. त्यामुळे मागच्या वर्षीच्या सदस्यांना मागच्यावर्षीच्या अनुभवांमधून आलेले शहाणपण वापरण्याची संधी मिळत रहायला हवी असे मला वाटते. त्याने त्यांचा संपादनाचा अनुभव वाढायला मदत होईल, त्याने त्यांची क्षमताही वाढेल आणि कदाचित काही अंकांच्या अनुभवांनंतर गुणात्मक फरकही पडू शकेल. मागील वर्षाच्या संपादक मंडळींपैकी कोणी ह्यावेळी वेळ नसल्याने, इच्छा नसल्याने वा काही वैयक्तिक कारणाने काम पाहू शकत नसतील तर अर्थातच ते केवळ मागच्यावर्षी संपादन मंडळामध्ये होते म्हणून ह्याही वर्षी त्यांनी असावे हे शक्य होणार नाही. अर्थात माझा वेगळ्या सदस्यांनी मंडळात येण्याला अजिबात विरोध नाही. ज्यांच्याकडे वेळ, इच्छा आणि क्षमता ह्यापैकी एक वा अनेक गोष्टी असतील त्यांनी माझ्यामते होईल ते सहकार्य जरूर करावे. अर्थात सर्वांना संपादक होता येणार नाही. संपादक मंडळाची सदस्यसंख्या मर्यादित असणे केव्हाही योग्य.
'सदस्यांनीच एकत्र येऊन खास दिवाळीनिमित्त साहित्य लिहून ते एका विवक्षित दिवशी सामुदायिकरित्या प्रकाशित करावे' हा विचार कितीही उत्तम असला तरी काहींच्या पुढाकाराशिवाय हे आपोआप घडणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर विचार करता मला अंकाची कल्पना योग्य वाटते.