जाणूनमानवाची शारिरीक क्षमता इतर प्राण्यांच्या तुलनेने खूपच कमी. त्याला जोरात पळता येत नाही की उडता येत नाही, तीक्ष्ण नजर आणि घ्राणेंद्रिये नाहीत. धारदार नखे किंवा दात नाहीत.नजरेचा आवाका मर्यादित. पण पंजाचा वापर करण्याची कला मानवास अवगत झाली. असे म्हणतात की मानवी मेंदुच्या विकासात त्याच्या अंगठ्याचा फार मोठा वाटा आहे. हे सर्व तार्किक दृष्ट्या सहज पटण्यासारखे आहे. पण   बौद्धिक वाढीसाठी जवळ जवळ अशीच अनुकूल परिस्थिती अन्य एप वर्गीय वानरात होती आणि आहे. उदा. गोरिला, ओरांग उटान, चिपांझी इ. मग त्यांच्यात सध्याच्या मानवी मेंदुच्या जवळपास सोडाच पण आदिमानवाच्या पातळीएवढाही विकास का नाही होऊ शकला? बरं शिकवलं तर ही वानरं अगदी प्राथमिक पातळीवरील गणितंही शिकतात. पण स्वतःहून काही करत नाहीत. त्यांना अन्नाचे आमिष दाखवावे लागते. तसेच मानवाने शिकवलेल्या गोष्टी पुढील पिढीत संक्रमितही करत नाहीत. नेमकी अशी कोणती गोष्ट आहे की जी विविध जातीत हा फरक घडवून आणते?

मला इथे मुळीच दैववादी वा देववादी विचार मांडायचे नाहीयेत. ही सृष्टी कोण्या ईश्वराने बनवली व तोच तिचे नियंत्रण करतो आहे, मानवाने प्रगतीच्या कितीही भराऱ्या मारल्या तरी अखिल सृष्टीचे नियंत्रण कोणाकडे तरी आहे त्यापुढे मानवी कर्तृत्त्व क्षुल्लक आहे अशा प्रकारचा प्रतिगामी आणि विज्ञानवादाला मारक असा विचार मला मांडायचा नाहिये.मला भाष्य करायचेय आणि विचारणा करायची आहे ती जीवसृष्टीबद्दल, जी मानवाने तर नक्कीच नाही ना घडवलेली? आणि अर्थातच आपल्या स्वतःबद्दल म्हणजे मानवाबद्दल जो अर्थातच जीवसृष्टीचाच एक भाग आहे.

निसर्गात तयार झालेला अगदी पहिला एकपेशीय जीव, वा त्यानंतर आलेले प्राथमिक अवस्थेतील जीवही  आपापल्या परिने नक्कीच परिपूर्ण होते असे म्हणता येईल. कारण अन्न मिळवणे वा स्वतः तयार करणे, स्वतःची वाढ करणे आणि आपल्यासारखाच जीवाची प्रतिकृती तयार करण्यासाठी पुनरुत्पादन करणे हे सर्व गुण ते जीव जेव्हा पहिल्याप्रथम निर्माण झाले  तेव्हाच आपल्यासोबत घेऊन "अवतरले". या प्राण्यांना आजूबाजुचे दिसायला हवे म्हणून निसर्गाने डोळेरुपी जगातले पहिले कॅमेरे त्यांच्या शरिरात बसवले. आसपासच्या ध्वनीची जाणीव व्हावी म्हणून कर्णेंद्रिये विकसित केली. ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ते ते ज्ञानेंद्रिय दिले. कल्पना करा आपल्याला एक यंत्रमानव बनवायचा असेल तर आपल्याला असलेल्या ज्ञानेंद्रियांसारखी यंत्रे आपण त्या यंत्रमानवात बसवू कारण आपल्याला दिसणे म्हणजे काय, ऐकू येणे म्हणजे काय , वास येणे म्हणजे काय हे अनुभवाने माहित आहे. पण ३०० कोटी वर्षांपूर्वी असं काहीच नसताना ` ते अनुभव' नवनिर्मित जीवाला मिळावेत यासाठी कोणत्या अदृश कल्पनेने हे सृजन केले? तसेच त्यापुढे जाऊन अधिकाधिक गुंतागुंतीची शरीररचना तयार झाल्या. हे सर्व आपोआप घडून आले असे म्हणणे विज्ञानविरोधी नाही का? कारण कोणत्याही गोष्टीमागे कार्यकारणभाव असतो असे विज्ञानच सांगते. मग वरील घटनांचे समाधानकारक कारण कोणते हेच तर मला विचारायचे आहे.

विज्ञान, अध्यात्म आणि गृहितके

अशा मूलगामी गोष्टींचा शोध घेताना विज्ञान काय किंवा अध्यात्म काय दोघांनाही काही गृहितके मान्य करावीच लागतात. कारण त्यापलिकडे शोधाची शक्ती वा कल्पनाशक्ती जाऊ शकत नाही.
जसे महास्फोटाआधी सारे विश्व एका परमाणूत सामावलेले होते इथपासून विज्ञान सुरूवात करते. मग त्याआधी काय होते? इथे परम अणू गृहित धरला आहे. तसेच पृथ्वीवर साडेतीन अब्ज वर्षापूर्वी काही अनाकलनीय रासायनिक अभिक्रियांनी पहिला जीव तयार झाला.कुणी म्हणतात तो धूमकेतूंनी बाहेरून आणला.मग तिकडे तरी कसा तयार झाला? वरील शक्यतेच्या मागे आपण जाऊ शकत नाही. हे देखील एक गृहितक झाले. यापलिकडील शक्यता अध्यात्म किंवा विज्ञान सांगत नाही.

या प्रश्नांची उतरे देता येतील असे काही प्रतिसादात मत व्यक्त केले आहे. पण ते खूप विस्तृत होईल म्हणून इथे देता येत नाही असेही म्हटले आहे. पण थोडक्यात सांगता आले तर अवश्य लिहावे.  जाणून घ्यायला नक्कीच आवडेल किंवा संदर्भ द्यावेत.