१. माणसाची 'प्रगती'
ज्या त्या जिवाला आपापल्या भोवतालात जगायला जितके किमान गुण आवश्यक असतात तितके गुण टिकतात. जास्तीचे काही गुण जगण्याच्या लढाईत भारभूत होऊ शकतात म्हणून अश्या जास्त काही असणाऱ्या जिवाची वाचून, वाढून पिले घालण्याची शक्यता कमी होते. मग ते गुण दोष ठरून त्या जीवजातीतून नष्ट होऊ पाहतात.
मानवाची शारिरीक क्षमता इतर प्राण्यांच्या तुलनेने खूपच कमी. त्याला जोरात पळता येत नाही की उडता येत नाही, तीक्ष्ण नजर आणि घ्राणेंद्रिये नाहीत. धारदार नखे किंवा दात नाहीत. नजरेचा आवाका मर्यादित.
कारण या सर्व गोष्टींची मानवाला गरज नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे केवळ वेगवान धावपटू किंवा धारदार दातांच्या माणसांना मुले होण्याचा अधिकार दिला, बाकीच्यांना मुले होण्यास बंदी घातली की हळूहळू हे गुणधर्म माणसात येतील. माणसाची मादी यातले कोणतेच गुणधर्म पाहून नराची निवड करत नाही त्यामुळे तसे आपोआप होण्याची शक्यता नाही.
माणसाला मोठ्या मेंदूची आवश्यकता भासली याची अनेक कारणे आहेत; पैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे खोटे बोलण्याची आवश्यकता! इतर कारणे - दुसऱ्या प्राण्याला (मुख्यत्वे टोळीतील माणसाला) काय दिसत असेल, काय वाटत असेल याचे गणित करण्याची गरज; टोळीतील इतरांशी संपर्काची गरज (भाषा, चिन्हे); काय केल्याने काय होईल याचे अनेक पायऱ्यांचे डावपेच रचण्याची गरज इ. आपल्या कपिबांधवांना तुलनेने सोपे भोवताल लाभले त्यामुळे त्यांची मेंदूची गरज जास्त वाढली नाही; कमी मेंदू असूनही त्यांचे पुनरुत्पादन व्यवस्थित चालू राहिले. मात्र माणूसकपीच्या एका गटाला इतक्या प्रतिकूल भोवतालाला तोंड द्यावे लागले की जास्तीत जास्त बुद्धिमान तेव्हढेच वंश वाढवू शकले. ही स्थिती सुमारे दहा ते तीस लाख वर्षांपर्यंत राहिल्याचा अंदाज आहे. त्याकाळात आपल्या पूर्वजांचे मोठे मेंदू विकसित झाले. त्यांच्या मानाने आपल्याला अगदी सोप्या भोवतालाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे मेंदूचा पूर्ण वापर करावा लागत नाही.
२. गृहीतके
पहिला जीव कसा तयार झाला याच्या अनेक शक्यता आहेत. त्या सर्व 'शक्य' आहेत. त्यातील रासायनिक क्रिया अनाकलनीय नाही. केवळ कोणती शक्यता खरी, कोणती रासायनिक क्रिया नक्की घडली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. महास्फोटाबद्दल माझे वाचन नाही त्यामुळे सांगू शकत नाही.
अध्यात्म, कश्यावर तरी श्रद्धा वगैरे माणसाच्या मनाची गरज आहे. आपल्या आईच्या जुन्या सुती साडीच्या पांघरूणात शिरल्यावर सुरक्षित, बरे वाटते; बाळपणी आईच्या कुशीत शिरल्यावर वाटायचे तसे वाटते; ती प्रत्यक्षात नसली तरी! तशीच कोणीतरी आपले बरे करील ही श्रद्धा! मला पांघरूणात शिरून छान वाटते पण श्रद्धा ठेवता येत नाही कारण लहानपणापासून अडचणीत आल्यावर आईकडे धावायचे म्हणजे बरे वाटते अशी शिकवण मनाला मिळाली आहे, तशीच कोणत्याही गोष्टीवर कारणे पूर्ण पटेपर्यंत श्रद्धा चुकीची हीही.