हा काय बाष्कळपणा आहे?

ही चर्चा स्वतंत्र ठेवावी.

दिवाळी अंक ही संकल्पना आणि संपादन याविषयी सदस्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी स्वतंत्रपणेच ती करता येईल.

अंकाचा निर्णय संकेतस्थळाचा आहे. त्याविषयीचा अंक असावा की नको इथंपासून ते संपादक असावेत की नको, तो प्रकाशित कसा करावा यासारखे निर्णय संकेतस्थळाचे प्रशासक (जे कोणी आणि किती असतील ते) घेतील. (याच नव्हे इतर कोणत्याही संकेतस्थळ किंवा माध्यमाच्या बाबतीतही) त्यांच्या त्या अधिकारावर इतर कोणीही अतिक्रमण करण्याची गरज नाही. ज्या क्षणी मनोगताच्या प्रशासकांना असं काही होणं नको असेल त्याक्षणी हा उपक्रम (संकेतस्थळ नव्हे; हो हा खुलासा गरजेचाच आहे) तिथंच थांबलेला असेल (संजोप रावांनी मौनसंमतीचा सूचक उल्लेख केला आहे). कारण त्यापुढं तो व्यर्थ असेल.

मतदान वगैरेही निरर्थक आहे. सदस्यांना हवा असो वा नसो, अंक द्यावयाचा असेलच तर संकेतस्थळ एक संस्था म्हणून ते केव्हाही करू शकतेच. इथं लोकशाही पद्धतीचा अवलंब केला म्हणून कोणी उगाच काड्या कोरण्याचे उद्योग करीत असेल तर त्याची दखल घेण्याची तसूभरही आवश्यकता नाही. कारण उद्या या न्यायाने संपादक कोण याचाही कौल घ्या असे कोणी म्हणेल. बोटं चालतात म्हणून काहीही टंकायचं आणि प्रकाशित होतंय म्हणून प्रकाशित करायचं असली थेरं ठरतात ही. अंकासाठी काम करणाऱ्या संपादकांनी आणि इतरांनी या बाबींकडे दुर्लक्ष केले तरच अंकाकडं लक्ष देऊन तो अधिक आशयघन करणे शक्य होईल.

संपादक, व्यावसायिक संपादक वगैरे विषयात इथं पडण्याचं काहीही कारण नाही. माझ्या माहितीप्रमाणे या संकेतस्थळावर माझ्याशिवाय किमान चार जण असे आहेत की जे व्यावसायिक संपादक (उपसंपादक ते संपादक यातील वेगवेगळ्या पायऱ्यांवर कार्यरत असणारे) आहेत. ते या अंकात असतील किंवा नसतील, तो त्यांचा स्वतंत्र निर्णय असेल. पण व्यावसायिक संपादकांची मनोगतावर वानवा आहे असेही कोणी मानायचं कारण नाही.

तुम्ही कोण टिक्कोजीराव हा सवाल अंगुलीनिर्देशात्मक आहे आणि त्याचा उलट परिणाम समजून सांगण्याची आवश्यकता भासू नये.

संपादन वगैरे मुद्यांवरील चर्चा थांबवून अंकात आशयात्मक काही भरीव करण्यासाठी काही सूचना सदस्यांनी केल्या तर ते अधिक श्रेयस्कर आणि प्रेयसही असेल.

काही आवश्यक स्पष्टीकरणं (संकेतस्थळावर वाद घालण्यासाठी सुतावरून स्वर्ग गाठण्याची वृत्ती ध्यानी घेता ही स्पष्टीकरणं आवश्यक ठरताहेत): मी गेल्या वर्षी अंकाच्या संपादनात थोडासा हातभार लावला होता. यंदा माझ्या इतर कार्यव्यस्ततेमुळं मी त्यात सहभागी होऊ शकणार नाही. या दोन्ही गोष्टींचा या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही. ज्यांना तो जोडायचा असेल ते त्यांच्या-त्यांच्या मतीप्रमाणे तसे करण्यास मुक्त आहेत. त्याविषयी मी कोणताही खुलासा करणार नाही.