मला संजोप रावांचे म्हणणे पूर्णपणे पटतेय.
मराठीचा अभिमान आणि मराठी प्रतिशब्दांचा अट्टाहास या शीर्षकाचा लेख मी अनेक दिवसांपासून लिहून ठेवला होता. पण तो प्रसिद्ध केल्यास अनेक मनोगती माझ्यावर तुटून पडतील या भीतीने प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही. माझी भीती साधार होती हे कळत नकळतचे शीर्षकगीत मधील प्रतिसादावरून दिसून आले. पाहा ना.. भ्रमणध्वनीचा रिंगटोन असा शब्दप्रयोग केल्याबरोबर खादाड बोक्याने नखे बाहेर काढलीच. (खाबो- ह. घ्या. ) संजोप रावांनी एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याने मी हा पूर्ण लेख प्रतिसाद म्हणून लिहित आहे. यात थोडे विषयांतर झाले असल्यास भावना समजून घ्याव्यात.
चर्चेचा विषय संगणकाशी संबंधित इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द असा असला तरी संजोप रावांनीच त्यात पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा चे भाषांतर तसेच भाकरी, लोणी इ.चे उदाहरण देऊन हा विषय सर्वसमाविष्ट केल्याने इथे संगणकासहित इतर सर्व विषयांवर मत व्यक्त करत आहे.
मराठी शब्दांचा अट्टाहास अनावश्यक
मराठी ही आपली मातृभाषा असल्याने तिचा अभिमान प्रत्येकाला असायला हवा. पण व्यावहारिक भाषेत संभाषण करताना वा लिहिताना प्रत्येक ठिकाणी मराठी प्रतिशब्द वापरणे (अगदी शब्दकोशात स्वीकारले गेलेले सुद्धा) व्यावहारिक वाटत नाही.
संगणकाशी संबंधित अनेक मूळ इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द तयार करणे अवघड नाही. पण भारतासारख्या बहुभाषिक देशात असे शब्द तयार करून त्या त्या भाषेत शिक्षण देणे सुरू केले तर पुढे नोकरी- व्यवसाय, दूरसंचार, प्रसारमाध्यमे अशा क्षेत्रात जिथे विविध राज्यातील लोक एकत्र येतात मोठाच गोंधळ उडू शकेल. हिंदीमध्येही हा एक विनोदाचा विषय झाला होता. उदा. संगणकाशी संबंधित काही शब्दांना पर्यायी हिंदी शब्द कसे दिसतील याचा इमेल अनेकांना आठवत असेल.
यापैकी काही पाहा..
सुक्ष्म मुलायम खिडकियां (मायक्रोसॊफ्ट विण्डोज)
खिडकियां२००० (विण्डोज २०००)
पर्दा बचाओ (स्क्रीन सेव्हर)
इत्यादी.
व्यावहारिक भाषेत इंग्रजीचा वापर
दूरदर्शनच्या सह्याद्रीवरील मराठी बातम्यांमध्ये अलिकडच्या काळापर्यंत खूप मराठी प्रतिशब्द वापरले जात होते. हळूहळू या बातम्यांमध्येही रूळलेले इंग्रजी शब्द येऊ लागले आहेत. आकाशवाणीवरील हिंदी समाचार ऐकलेत तर त्याच्या नावापासूनच स्वभाषेला सुरूंग लागलेला दिसतो. कारण या बातमीपत्रालाच ते `समाचार बुलेटीन' म्हणतात. प्रत्यक्ष या समाचारांमध्येही भरपूर इंग्रजी शब्द वापरले जातात. कधी उर्दू खबरे ऐकल्यास त्यातही इंग्रजी शब्दांचा बाऊ केलेला आढळणार नाही. वास्तविक भारतातील मराठीखेरीज अन्य सर्व भाषा उदा गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड, मलयालम, बंगाली इत्यादी. कोणत्याच भाषेला आपली भाषा मरणपंथाला लागली आहे अशी भीती वाटत नाही. मग मराठी भाषकांच्याच मागे हा भीतीचा ब्रह्मराक्षस का लागला आहे? आणि आपली भाषा अशुद्ध करणारा, आपल्या भाषेला संकटात आणणारा मुख्य शत्रू कोण तर इंग्रजी भाषा असा समज पसरवला जात आहे.
भाषा ही बदलांमुळेच समृद्ध होते.
जगातील कोणत्याही भाषेत कालानुरूप बदल होत गेले आहेत. मराठीचेच घ्या. `अमृतातेही पैजा जिंके' अशी संत ज्ञानेश्वरांची ७०० वर्षांपूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात फरक पडला आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील, पेशवेकालीन वा अगदी ब्रिटिश राजवटीतील मराठी आजच्या सारखी नव्हती. त्याकाळातील मराठी बदलत बदलत सध्याची मराठी अस्तित्त्वात आली.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा. पण देशात सर्वत्र एकसमान हिंदी बोलली जात नाही. उत्तरेतील तिचा लहेजा पंजाबी धाटणीचा आहे तर दक्षिणेकडे ती अधिक पुस्तकी छापाची वाटते. गरज पडेल तसे हिंदी भाषकांनी स्थानिक शब्द स्वीकारले. कोणे एकेकाळी मुंबईत आलू प्याज हे शब्द ऐकायला मिळायचे आज कोणताही भेळवाला भय्या सररास (सर्रास हा उच्चार चुकीचा आहे )बटाटा-कांदा हे शब्द वापरतो. किती वाजले हे विचारताना एखादा अशिक्षित सुद्धा `टाइम काय झाला? ' असेच विचारतो.
इंग्रजीतही भेसळ?
इंग्रजीची कथाही फारशी वेगळी नाही. इंग्रजीतील असंख्य शब्द हे मूळ ग्रीक, रोमन वा लॅटीन शब्दांवरून आले आहेत. दरवर्षी इंग्रजीत जगभरातील भाषांमधील शब्द आयात होत असतात व ऑक्सफर्ड/वेबस्टर शब्दकोशात त्यांना स्थान मिळत असते. मागील वर्षी गुगल हा शब्द त्यांनी समाविष्ट केला. ते लोक त्या मूळ परकीय शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द शोधण्याच्या फंदात पडत नाहीत. उदा. पान हा हिंदी शब्द. त्याला ते पानच म्हणतील. उगीच ही इज इटींग लीफ म्हणणार नाहीत. इंग्रजी भाषेची जननीही संस्कृत असावी. संस्कृत मधील १ ते १० आकडे पाहा आणि इंग्रजीतील पाहा.
एकम (one), द्वी (Two), त्रि(three),पंच (five), षट (Six) सप्त (Seven ) अष्ट (eight) नवम (Nine), दहम (Ten / Deca) या उच्चारांमध्ये विलक्षण साम्य आहे. ते कशामुळे? याशिवाय अनेक इंग्रजी शब्द संस्कृतोद्भव आहेत ज्यांची यादी इथे देता येणार नाही. अलिकडे योगा, गुरू, पंडित, करिस्मा, सारी असे काही भारतीय शब्द इंग्रजीत जसेच्या तसे स्वीकारले गेले आहेत. यामुळे इंग्रजी समृद्धच झाली आहे.
याउलट आपल्याकडे मराठी वापराच्या हट्टापायी आणि अतिउत्साहापायी अनेक लेखांमध्ये `परदेशी दूरचित्रवाणी' ऐवजी `परदेशी दूरदर्शन' असा शब्दप्रयोग सररास वाचायला मिळतो.
पण काही मराठी लोकांना बोलताना सोप्प्या मराठी शब्दांऐवजी उगीचच इंग्रजी शब्द घुसवण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांचे "सुशिक्षितपण' सिद्ध होत नाही. एका मराठी वाहिनीवरील गाण्यांच्या कार्यक्रमाला संगीतकार आनंदजी आले होते. ते मराठी नसूनही अस्खलिखित मराठीतून बोलले पण अनेक मराठी मंडळीच त्या कार्यक्रमात खूप इंग्रजी शब्द बोलताना आढळतात. धेडगुजरी मराठी-इंग्रजी भाषेचा अतिरेक करणाऱ्यांची पुलंनी आपल्या पाळीव प्राणी मध्ये चांगली `नोंद' घेतली आहे, पण विनोदी अंगाने. आपल्या कुत्र्यांशी इंग्रजीत बोलण्याची सवय असणारी एक श्वानस्वामिनी त्यात म्हणते `यू आर बिकमिंग अ व्हेरी बॅड डॉग बरं का.. नाऊ लीव्ह माय पदर लीव्ह माय पदर'
मराठीला धोका कधी?
आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण सहजतेने इंग्रजी शब्द बोलत असलो तरी व्याकरण तर मराठीतूनच चालवतो ना? ही मूळ मराठी सोडून जर आपण अन्य भाषा बोलू लागलो तरच मराठीला धोका आहे असे म्हणता येईल, जे मुंबापुरीत घडू लागले आहे. मुंबईची बोलीभाषा आता हिंदी झाली आहे. दोन अपरिचित मराठी माणसे सुरूवात हिंदीतून करतात. पाच सहा मित्रांच्या गटात एक सोडून सर्व मराठी असले तरी त्या एकट्याच्या सोयीसाठी सर्व हिंदीतून बोलताना आढळतात. या अशा वृत्तीमुळे मराठीचे नुकसान होते आहे. इंग्रजी शब्दांचा बाऊ करणे म्हणजे दोरीला साप समजून धोपटण्यासारखे आहे.
खाली मी ३० वाक्ये दिली आहेत. डाव्या बाजूस इंग्रजी शब्द वापरून तर उजव्या बाजूस मान्यताप्राप्त मराठी प्रतिशब्द वापरून तेच वाक्य वाचून प्रामाणिकपणे सांगा की आपण ही वाक्ये कधी उच्चारली असतील तर ती अधिक करून कोणत्या बाजूची असतील? डाव्या की उजव्या?
१. काल मित्राचा फोन आला होता. काल मित्राचा दूरध्वनी आला होता.
२. पीसी चालू कर. संगणक सुरू कर
३. हे पेन मला गिफ्ट मिळाले ही लेखणी मला बक्षीस म्हणून मिळाली.
४. तुझा मोबाईल नंबर काय? तुझा भ्रमणध्वनी क्रमांक काय?
५. भाजी फ्रीज मध्ये ठेवा. भाजी शीतकपाटात ठेवा.
६. ८:२४ च्या फास्ट ने आलो ८:२४ च्या जलद ने आलो
७. सचिनला खोटा एलबी दिला सचिनला खोटा पायचित दिला
८. स्टेशनसमोरच्या बसस्टॉपवर ये स्थानकासमोरच्या बसथांब्यावर ये
९. थर्मामीटर मिळाला का? तापमापक मिळाला का?
१०. लताची कॅसेट आहे? लताची ध्वनीफित आहे?
११. त्याचा पुण्यातही प्लॅट आहे. त्याची पुण्यात सदनिका आहे.
१२. फर्स्ट क्लासनेच जा पहिल्या वर्गाने जा.
१३. फुलपास झालो. सर्व विषयात उत्तीर्ण झालो
१४. त्याला बेल मिळाला त्याला जामीन मिळाला
१५. पिक्चरला जाऊया? चित्रपटाला जाऊया?
१६. कोणत्या कॉलेजमध्ये आहेस? कोणत्या महाविद्यालयात आहेस?
१७. हे काम मुनिसिपालिटीचे हे काम महानगरपालिकेचे
१८. दिवसभर लाईट गेले आहेत दिवसभर वीज गेली आहे.
१९. लोडशेडींग किती तास? भारनियमन किती तास?
२०. डेक्कनचे रिझर्वेशन आहे डेक्कनचे आरक्षण आहे.
२१. हा की-बोर्ड स्मूथ आहे. हा कळफलक मऊ(?) आहे.
२२. सिग्नलला डावीकडे वळ संकेताशी डावीकडे वळ.
२३. थर्मासमध्ये चहा गरम राहील समशीतोष्ण भांड्यात चहा गरम राहील.
२४. मार्कलिस्टची झेरॉक्स काढ. गुणपत्रिकेची छायाप्रत काढ.
२५. आज ट्रॅफिक जॅम आहे आज वाहतुक कोंडी झाली आहे.
२६. रिमोट इकडे दे दूरनियंत्रक इकडे दे.
२७. आजची वनडे डे-नाईट आहे आजचा एकदिवसीय सामना दिवस-रात्रीचा आहे.
२८. व्होल्टेज कमी असल्याने ट्यूब विभवांतर कमी असल्याने विद्युतशलाका
लागत नाहीये. लागत नाहीये.
२९. चेक बाउंस झाला धनादेश उसळला
३०. फायरब्रिगेडला पावसाळ्यातही अग्निशमनदलाला पावसाळ्यातही
काम पडते काम पडते.
डाव्या बाजुचीच वाक्ये अधिक प्रमाणात उच्चारली जातील असे आपल्याला आढळेल.
याशिवाय काही सररास वापरले जाणारे इंग्रजी शब्द आणि कंसात मराठी प्रतिशब्द
ड्रायव्हर(चालक), मेडिकल स्टोअर (औषधाचे दुकान), गॅस सिलिंडर, लायटर, इंडिकेटर (दर्शक), ऑपरेशन (शस्त्रकिया), हॉस्पिटल (इस्पितळ), लाऊड स्पीकर (ध्वनीक्षेपक),सेलोटेप, पेन्शन (निवृत्ती वेतन), पीएफ (भविष्य निर्वाह निधी), बिल (देयक), पासपोर्ट (पारपत्र).
कितीतरी वाक्प्रचार वा म्हणी आपल्याला मराठी वाटतील पण त्या चक्क इंग्रजीतून भाषांतरित झाल्या आहेत.
उदा. हस्तीदंती मनोरे (आयव्हरी टॉवर)
पुस्तकी कीडा (बुक वर्म)
वरील वाक्यातील अनेक मराठी शब्द उदा. दूरध्वनी, भारनियमन, कार्यालय, महाविद्यालय असे शब्द वर्तमानपत्रातून, मराठी बातम्यांमधून ऐकायला मिळतात. तरीही सर्वसामान्यांच्या तोंडवळणी हे शब्द बसलेले नाहीत.
अनेक मराठी शब्द हे इंग्रजी शब्दांचा अपभ्रंश होऊन आले आहेत.
उदा. तिकीट(Ticket),वाघीण(वॅगन),रूळ (Rail),मास्तर (Master),पोष्ट (Post), अकादमी (Academy)
इंग्रजी शब्दांचे आकर्षण, न्यूनगंड की सवय?
बंबई,Bombay चे मुंबई होऊन अनेक वर्षे झाली तरी अनेक मराठीजन Bombay म्हणण्यात धन्यता समजतात जणू काही मुंबई उच्चारले तर जीभ कायमची वाकडी होईल अशी त्यांना भीती वाटत असावी. पण हेच लोक मद्रास विसरून चेन्नई मात्र सहज बोलतात. याला शब्दांचा वापर करण्यातील न्यूनगंड किंवा संकोच म्हणता येईल. असाच काहीसा प्रकार मुंबईतील बेस्ट च्या थांब्यांबद्दल म्हणता येईल. ज्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊ शकली त्यांचे स्मारक हुतात्मा स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे आणि बेस्ट सेवा आपल्या बसेसवर स्पष्टपणे हुतात्मा चौक असा वर्षानुवर्षे उल्लेख करत आहे. तरीही हजारो मुंबईकरांना हुतात्मा चौक असे तिकीट मागण्यापेक्षा फाउंटन म्हणणे सोपे वाटते आणि अशी अनेक ठिकाणे आहेत. मुद्दा इथे हाच आहे की डोळ्यासमोर विशिष्ट नाव सतत दिसूनही लोक ते नाव व्यवहारात का वापरत नाहीत? व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे बोरिबंदर स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले तरी लोक तिकीट मागताना व्हिटी मागतात. बरेच लोक सीएसटी म्हणतात. खुद्द रेल्वेच गाड्यांवर सी एस टी असा फलक लावते. या सी एस टी मुळे नामांतराचा उद्देश असफल होत नाही का? कारण अनेकांना CST म्हणजे काय हेच माहित नसते. मुंबईतील नामांकित व्ही जे टी आय (व्हिक्टोरिया ज्युबिली टेकनिकल इन्स्टिट्यूट) चे नामांतर झाले पण नामांतरानंतरही लघुरूप व्हीजेटीआय हेच राहील याची काळजी घेतली गेली आणि नवीन नाव झाले वीर जिजामाता टेकनिकल इन्स्टीट्यूट. याचे कारण लोकांच्या तोंडात रूळलेले शब्द बदलू नयेत हेच आहे.
एखाद्या भाषेचा प्रभाव कमी होण्याचे अजून एक कारण म्हणजे एखाद्या नागरी वस्तीमध्ये विशिष्ट भाषकांची वाढती संख्या तसेच त्या समाजाची वाढती क्रयशक्ती. उदा. मुंबईतील कांदिवली उपनगराचे देता येईल. या भागात गुजराती समाजाची वस्ती एवढी आहे की येथील दुकानदार नावांच्या पाट्या गुजरातीमध्ये लावतात. येथील बँकांवर सुद्धा इंग्रजी आणि गुजराती फलक आहेत. त्रिभाषा सूत्रीनुसार न बोललेले बरे.
इंग्रजीला विरोध हे परिपक्वतेचे लक्षण नाही.
इंग्रजांविरूद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनीही कधी इंग्रजीला एवढा विरोध केला नाही. टिळक, गांधी, नेहरू या सर्वांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली, त्या भाषेत उच्चशिक्षण घेतले. स्वामी विवेकानंदांनी इंग्रजीतच भाषण करून शिकागो धर्मपरिषद जिंकली.
इंग्रजी पोषाखाबद्दल याच धोरणाचा अवलंब कराल?
इंग्रजीला प्रतिशब्द शोधत बसणे माझ्या तरी मते इंग्रजीला विरोध केल्यासारखेच आहे. तेव्हा मूळ समस्या ओळखा. इंग्रजी शब्द न वापरल्याने भाषाशुद्धी होते हा समज दूर ठेवा. इंग्रज गेले तरी त्यांचे पोषाख आपण स्वीकारलेच ना? तुमच्यापैकी कितीजण पारंपारिक धोतर नेसतात? बहुतेक सर्व मराठीजनांनी (पुरुष मंडळी) आज शर्ट पँटचा स्वीकार केलाय ना? अलिकडे रोज नाही तरी शनिवारी जीन्स-टी शर्ट घालतातच ना? का तर ते सोयीस्कर पडते म्हणून. मग जर काही इंग्रजी/हिंदी शब्द सोपे आणि सोयीस्कर वाटत असतील तर ते का वापरू नयेत? भाषेच्या बाबतीत ही दुटप्पी वृत्ती का? याउलट ते चिंदबरम पाहा. पारंपारिक लुंगी नेसतात पण इंग्रजीचा आधार घ्यायला त्यांना (किंवा कोणत्याच दक्षिण भारतीयाला) कमीपणा वाटत नाही. त्याचवेळी दाक्षिणात्यांनी त्यांच्या राज्यात स्वतःच्या राजभाषेचा पूर्ण मान राखला आहे.
तेव्हा फक्त मराठी लोकांपुढे शुद्ध मराठीत बोलण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा बाहेर अमराठी व्यक्तीशीही मराठीतच बोलण्याचा आपण प्रयत्न करूया.... तो ही सर्वांना समजेल अशा मराठीत... अमराठी आणि मराठी दोघांनाही...
आपला मातृभाषाप्रेमी
मंदार