सुमारे सात- आठ वर्षांपूर्वी दादरच्या मॅजेस्टिकच्या श्री. अनिल कोठावळ्यांशी बोलत होतो. त्यांचे टिळक पुलाशेजारी मराठी पुस्तकांचे मोठे दुकान आहे-- मांडून ठेवलेली पुस्तके, 'तुम्ही बघा, चाळा, हवे ते विकत घ्या, तसेच काही विशेष माहिती हवी असल्यास अनुभवी व जाणकार असा कर्मचारी वर्ग हाताला', असे मराठी पुस्तकांचे मुंबईतले पहिले दुकान. धंदा चालवणे दिवसेंदिवस किती कठीण होते आहे, ह्याविषयी ते पोटतिडीकीने बोलत होते. परदेशात, विशेषतः अमेरिकेत खूप मराठी माणसे आहेत, तेव्हा आपण इंटरनेटवर (वेब साईटवरून) विक्री का करत नाही, वगैरे विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की अमेरिकेत (त्यावेळी नुकत्याच) भरलेल्या बृहनमहाराष्ट्र संमेलनात ते व तसेच इतर मराठी प्रकाशक व अनुभवी दुकानदार विक्रीसाठी म्हणून भरपूर पुस्तके घेऊन गेले होते. तिथे जे झाले, अनुभवले ते अत्यंत निराशाकारक होते. मंडळी संमेलनाला म्हणून खर्च करून, दुरून येत होती, पुस्तके थोडीफार चाळून बघत होती, पण विकत मात्र घेत नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार शेवटी बरीच पुस्तके उरली, ती परत आणण्याचा खर्च करण्यापेक्षा त्यांनी तेथेच ती फुकटात देऊन टाक्ली.