हे खरं आहे की संस्कृती हे एक मोठे संकुल आहे. आणि त्यामुळेच ह्या संकुलात असणाऱ्या सर्व गोष्टींची चर्चा (त्यात कालानुरूप झालेले बदल, त्यांच्या आत्ताच्या स्वरूपाची योग्यायोग्यता ह्याबाबत) व्हावी अशी अपेक्षा आहे. हेदेखील मान्य की राजवाड्यांच्या पुस्तकातल्या काही निवडक उताऱ्यांच्या जोरावर संस्कृतीची चर्चा करणे योग्य ठरणार नाही. तो एकांगी विचार ठरेल. पण केवळ चर्चेचा प्रस्ताव म्हणून ते उतारे दिले आहेत. त्यात मनोगतींनी आपल्याकडील उदाहरणांची भर घालावी ही अपेक्षा आहे.
रोटीबेटीच्या व्यवहाराबाबत बोलायचे झाल्यास त्याबाबत हल्ली स्पृश्यास्पृश्यता पाळण्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागले आहे. आंतरजातीय विवाह आता बऱ्यापैकी मोकळेपणाने होऊ लागले आहेत. आंतरधर्मीय, अगदी कमी प्रमाणात आणि भीतभीत का होईना, पण होत आहेत. मला वाटते की वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये (भारतीय, युरोपीय, अमेरिकी, इ.इ.) असाच बदल घडतोय. काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे तर काही ठिकाणी नुकतीच सुरुवात झालीये. जर सर्वच संस्कृतींमध्ये सारख्या पद्धतीनेच हे व्यवहार होतात तर मग वेगवेगळ्या संस्कृतींना 'रोटीबेटी'च्या आधारावर वेगळेपण मिळते का?
कामजीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याला सांस्कृतिकपणापेक्षा व्यक्तिगतपणाच जास्त आहे असे मला वाटते. (तुमचे आणि माझे कामजीवन सारखेच असेल असे नाही. तरीही आपण आपली भारतीय संस्कृती आहे असे म्हणतो.)
खाद्यजीवनाबाबत बोलायचे झाल्यास मराठी आणि दाक्षिणात्य खाद्यजीवनातदेखील बरीच तफावत आढळून येते. मी रोज पोळी-भाजी-वरण-भात खाणारा माणूस. हाटेलात जाऊन नाहीतर कोणत्यातरी रविवारी घरी इडली, डोसा खाणाऱ्यातला. मराठी माणूस हल्ली जितक्या प्रमाणात डोसा, उत्तप्पा खातो तितक्याच प्रमाणात पिझ्झा, बर्गर खाऊ लागलाय. मग खाद्यजीवनावर आधारीत माझी आणि एखाद्या दाक्षिणात्याची संस्कृती एकच असे छातीठोकपणे कोण सांगू शकेल? जर एखाद्या सुब्रह्मण्यमची आणि माझी संस्कृती एकच असेल तर मग एखाद्या लिओनार्दोची आणि माझीही संस्कृती समानच नाही का?
भाषेबद्दल बोलायचं तर (कुठेतरी वाचल्याचं आठवतंय की) दर ११ किमीला भाषा बदलते. मला फ्रेंच, जर्मन, आर्पिटान जितक्या परक्या आहेत तितक्याच बोडो, गढ़वाली आणि सांपोचे परक्या आहेत. मग एखादा दिब्रुगढचा पेपरवाल्याशी मी जितक्या सहज सांस्कृतिक संवाद साधू शकेन तितक्याच सहज मी तो एखाद्या ऑन्रीशी (Henryचा फ्रेंच उच्चार 'ऑन्री'सारखा होतो.) किंवा यॅकसशी बोलू शकेन.
वेशभूषेबद्दलदेखील आता जागतिक स्तरावर इतकी सरमिसळ होते आहे की मी 'भारतीय वेशभूषा' असा शब्द वापरण म्हणजे एखादं जुनाट पुस्तक उघडून बसण्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण हल्ली एखादा 'श्रीरंग' हा एखाद्या 'रॉबर्ट'सारखेच कपडे घालतो.
(आपण सांगितलेल्या मुद्द्यांपैकी) राहती राहिली धार्मिक कृत्ये आणि सामाजिक व्यवहार. आता तर धार्मिक कृत्यांमध्येदेखील बदल होत चालले आहेत. कित्येक गोष्टी कालबाह्य होऊन नाहीशा झाल्या आहेत. (उदा. अश्वमेध यज्ञ
) जे काही शिल्लक आहे त्याबळावर आपली संस्कृती वेगळी म्हणणे हे तितकेसे बरोबर वाटत नाही.
सामाजिक व्यवहार म्हणजे आपल्याला काय (काय) अभिप्रेत आहे ते थोडे स्पष्ट केले तर बरे होईल.
म्हणजे बऱ्याच बाबतीत आपण (भारतीय) जगातील इतर लोकांप्रमाणेच व्यवहार करत असू तर आपली (भारतीय) संस्कृती वेगळी कशी? आणि जर काही टिकवायचं असेल तर ते काय?
भारतीय/हिंदू संस्कृती ही आता ग्रीक/रोमन (थोडेसे कालविसंगत वाटल्यास युरोपीय/अमेरिकी/रशियी असे म्हणू) वेगळी न राहता एक जागतिक संस्कृतीच नाही का निर्माण होत आहे?
मग संस्कृती नक्की कशाला म्हणायचे?