संस्कृती स्वतःपासून सुरू होते. ती प्रत्येकाची वेगळी असू शकते. सकाळी लवकर उठणे ही माझी संस्कृती आहे, नुसती सवय नाही! तसे केले नाही तर मला पाप केल्यासारखे वाटते. माझे तोंड धुवून झाल्यावर मला न विचारता चहा मिळतो. कारण आमच्या कुटुंबाची तशी संस्कृती आहे. उत्तरी भारतात अंथरुणावर पडून तोंड न पिता चहा पितात. तशी त्यांची संस्कृती आहे. दक्षिणी भारतात चहा हवा का म्हणून विचारतात, काहीच उत्तर नाही दिले तर नको आहे असे समजतात. सकाळचा चहा मागणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. मराठी माणसे जेवताना आधी मीठ वाढल्याशिवाय इतर पदार्थ वाढत नाहीत. महाराष्ट्रानजीकच्या आंध्रात, कर्नाटकात, गुजराथेत आणि मध्य प्रदेशातही हीच पद्धत आहे. महाराष्ट्रात जेवणाची (रिकामी)पाने मांडतात व पानावर बसल्यावर वाढतात, उत्तरेत खाणे लावतात. दक्षिणेत तर जो जसा येईल तसा खाऊन जातो असे दृश्य मी एका घरंदाज समजणाऱ्या घरात पाहिले आहे. लग्नात पंक्तीतले सर्वजण एकाच वेळी जेवायला सुरुवात करतात अशी आपली कल्पना असते. पण एके ठिकाणी असे पाहिले की आम्ही सुरुवात करायच्या आत काही लोकांचे निम्मे जेवण संपले होते, अगदी वधूचेसुद्धा! नाटके वाचणे, पाहणे आणि नाटकात काम करायची आवड असणे ही मराठी संस्कृती आहे. गुजराथ आणि उत्तर भारतीय सिनेमाचे शौकीन. मुंबईला थोड्या दिवसांकरिता येऊन तिकडे गेले की, 'कोणकोणत्या फिल्मा पाहिल्या,' किती शूटिंग्ज पाहिली', अमुक नटीचे घर जिथे आहे त्या भागात गेला होता का, ती दिसली का?' हे प्रश्न हटकून विचारले जातात. आलेल्या अतिथीला आल्याआल्या न विचारता पाणी आणून देणे ही मुंबईची संस्कृती, पुण्यात असे क्वचित दिसेल.
थोडक्यात काय अशा सर्व लहानसहान गोष्टीतून व्यक्तीची, कुटुंबाची, शहराची आणि समाजाची संस्कृती बनते. एका देशातील सर्व समाजांच्या संस्कृतीत जे मोठ्या प्रमाणात आढळते, ती देशाची संस्कृती. आणि खरोखर, अनेक गोष्टी समाईक आढळतात, त्यामुळे भारतात कोठेही फिरले तरी बावचळल्यासारखे होत नाही.
मराठी भाषा, लिपी, व्याकरण, साहित्य, मराठी पोषाख-समारंभ-व्यवसाय ही मराठी संस्कृतीची अंगे आहेत, तिच्यावर आक्रमण झाले की चळवळी सुरू होतात.