तुम्ही संस्कृती ही स्वतःपासून सुरू होते असे म्हणता. आणि त्या समर्थनार्थ दिलेली उदाहरणेदेखील चांगली आहेत. पण तुम्ही दिलेली उदाहरणे मला केवळ व्यक्तिगत संस्कृती वेगळी असू शकते असे सांगणारी न वाटता एकाच देशात अनेक प्रांतिक संस्कृत्या (संस्कृती ह्या शब्दाचे अनेकवचन 'संस्कृत्या'च होतं ना?) असू शकतात असे सांगणारी वाटतात. म्हणजे पुन्हा भारतीय संस्कृती म्हणजे काय ह्याचा उलगडा होतच नाही.
ही उदाहरणे देऊन झाल्यावर आपण म्हणता की एका देशातील सर्व समाजांच्या संस्कृतीत जे मोठ्या प्रमाणात आढळते, ती देशाची संस्कृती. आणि खरोखर, अनेक गोष्टी समाईक आढळतात, त्यामुळे भारतात कोठेही फिरले तरी बावचळल्यासारखे होत नाही. मला हेच विचारायचं आहे की ह्या समान गोष्टी कोणत्या आहेत. माझ्यात आणि एखाद्या राजगोपालाचारी किंवा हितेन पटेल मध्ये अशा कोणत्या गोष्टी सारख्या आहेत ज्यांच्यामुळे आमची संस्कृती भारतीय आहे? ह्याच गोष्टींबाबत माझ्यात आणि एखाद्या जॉर्ज किंवा जिऍनमिंग किंवा ओकामुरा मध्ये भिन्नता आढळेल काय?