जेव्हा आपण मेमेटिक्स बद्दल बोलतो तेव्हा मला वाटतं की 'स्वाभाविक निवड' (Natural Selection) ही एक फार महत्त्वाची संकल्पना आहे. मला वाटतं की रिचर्ड डॉकिन्सने मीम (meme) हा शब्द जीन (gene) ह्या शब्दावरून घेतला आहे आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणेच मेमेटिक्सचा अभ्यास करता येऊ शकतो असे तो म्हणतो. आणि संस्कृतीबद्दल बोलताना 'नॅचरल सिलेक्शन' किंवा 'सर्वाय्वल ऑव्ह् द फिटेस्ट' ह्या गोष्टी बोलायला मी थोडासा कचरतो. आणि 'फिट' म्हणजे नक्की काय असा प्रश्न मला पडतो. आपली संस्कृती 'फिट' आहे की नाही? जर ती मुळातच 'फिट' असेल तर ती वर्षानुवर्षे निश्चितच अस्तित्वात राहील. (ती हजारो वर्षांपासून अजूनही अस्तित्वात आहे म्हणजेच ती फिट आहे असं काही जण म्हणतात. पण मग हजारो वर्षांपासून नक्की काय अस्तित्वात आहे? मी तरी अनेक गोष्टींमध्ये अनेक बदल झाल्याचं ऐकलंय.) पण मग 'फिट' म्हणजे तरी नक्की काय?
ज्या गोष्टी आपण आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून सांगितल्या त्या कालौघात बदलत आल्या आहेत. (उदा. पॉलिगमी) खाद्यविषयक सवयींचं बोलायचं झाल्यास त्या प्रत्येक घरी वेगवेगळ्या असू शकतात. खाद्यविषयक आचरण हे जर घरोघरी वेगळं असेल तर प्रत्येक घराची संस्कृती वेगळी म्हणता येईल का?
सर्व जगातील लोक एकत्र जमले, ते सर्व दिसायला सारखे असले तर त्यांच्या ज्या आचरणामुळे ते भारतीय म्हणून ओळखले जातील ते आचरण म्हणजे भारतीय संस्कृती. असं आपण म्हणता. पण ते आचरण म्हणजे नेमकं काय (काय) हा माझा प्रश्न आहे.

- चैत रे चैत.