समस्त कविमंडळींचे वर्णन कुठल्याशा पाश्चात्य साहित्यिकाने केले आहे ते असे - A savage in civilized society....!!!

एकतर कवी़; त्यात वर सॅव्हिज! रानटी, असंस्कृत माणसाने कसा काय घ्यायचा या `सु-संस्कृत` चर्चेत भाग? :)  पण चर्चा एवढी रंगली आहे की,  थोडेसे लिहिल्याशिवाय मला चैनच नाही पडणार.

................

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास  हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे अत्युत्कृष्ट पुस्तक मी कितीदा वाचले, याची गणतीच नाही.  संस्कृती, सभ्यता (हा शब्द मराठी भाषेतल्या अर्थानेच घ्यावा! )  वगैरेंबाबत आपणच आपल्या भोवती निर्माण केलेल्या कवचाच्या तर हे पुस्तक ठिकऱ्या ठिकऱ्या करतेच; पण आपण प्राणपणाने जपलेल्या आपल्या आतील माणसावरही ते मर्माघात करते... पुराव्यांसह! इतिहासाचार्यांना आजच्यासारखी सनसनाटी निर्माण करण्यासाठी काही लिहायचे नव्हते, त्यामुळे जे संशोधनात आढळले, ते लिहून ते मोकळे झाले... त्यांचा पिंड अस्सल संशोधकाचा. तुमच्या पुढे कुणी आरसाच धरला तर तुम्ही काय युक्तिवाद करणार? नाही हो, मी दिसायला असा नाही; तसा आहे, असे म्हणणार? असो.

................

आता मला, संस्कृतीच्या आणि शीलाच्याच अंगाने, पुरुषी मानसिकतेमधील दांभिकतेकडे इथे (विशेषतः संस्कृती म्हणजे केवळ स्त्रीचे शील, असे मानणाऱ्यांचे ) लक्ष वेधायचे आहे. ही दांभिकता ज्या वेळी नष्ट होईल, त्या वेळी संस्कृती म्हणजे काय, असा प्रश्न आपल्याला पडणार नाही.... पण माझी (दुर्दैवाने) खात्री आहे की, आणखी कितीतरी हजारो वर्षे आपण या प्रश्नावर हिरीरीने चर्चा करीत राहू...!!!

संस्कृती हा विषय आज (आणि हजारो वर्षांपूर्वीही) दुर्दैवाने स्त्रीच्या शीलाशीच जोडला गेला आहे. पुरुषाने कसेही वागले तरी संस्कृतीचा केसही वाकडा होत नाही! पण स्त्रीने जराही वाकडे  वागता कामा नये. तिचा पाय घसरता  कामा नये...! (याचा अर्थ स्त्रीने तसे वागावे, असे मला म्हणायचे आहे, असा अर्थ कुणी घेऊ नये, कृपया! ). पण आपल्याप्रमाणेच स्त्रीलाही मन आहे, कधीमधी तिच्याही मनाचा लंबक जरा इकडे-तिकडे होऊ शकतो, हे कधी कुठल्या पुरुषाने उमद्या मनाने समजून घेतले असावे का?

... पुरुषी मानसिकतेत शतकानुशतके रुजलेला दांभिकपणा काही उदाहरणांवरून मला दाखवून द्यावासा वाटतो. प्रथम उदाहरण घ्या चॅस्टिटी बेल्टचे. इटली, फ्रान्समध्ये मध्ययुगात जन्मलेली ही संकल्पना. लढाईवर जाणाऱ्या सरदाराची बायको घरी मागे एकटीच राहणार... मग आपल्या मागे तिने काही भलतेसलते  केले तर ? शीलभंग होईल असे काही ती वागली तर? म्हणून मग चॅस्टिटी बेल्टचा तिच्यावर `पहारा! `  तिकडे लढाईवर गेलेल्या पुरुषाने लढाईच्या विश्रांतिकाळात दाखविलेली मर्दुमकी तिने मात्र डोळ्यांआड करायची... (खरोखरच डोळ्यांआड घडणारी ती गोष्ट. डोळ्यांआड करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय तिच्याकडे? ). पण तिने मात्र घरात चॅस्टिटी बेल्टच्या सहवासात संस्कृतिसंवर्धन  करीत बसायचे....!!!
चॅस्टिटी बेल्ट शरीराला बांधता येतो; मनाला नाही, हे चॅस्टिटी बेल्टची, आपल्या बायकोवर सक्ती करणाऱ्यांना,  कधी कळले की नाही कुणास ठाऊक!

मध्ययुगातून आता जरा मागे जात रामायण-महाभारतात चक्कर टाकू या. ही दोन अजरामर आणि वंदनीय काव्ये कधीकाळी भारतभूमीवर कुणी खरोखरच जगून गेले आहे, असे मानले तर [ जे मानत नाहीत, त्यांच्यासाठी ही सोय :) ] त्या दोन काव्यांमधील उदाहरणे घेऊ या.

पहिले उदाहरण मर्यादापुरुषोत्तमाचे. वनवासात जवळपास चौदा वर्षे प्रभू श्रीरामचंद्रांच्या सहवासात जानकी राहिली.   अखेरचा काळ रावणाच्या बंदिवासात. नंतर युद्ध. रावणावर रामविजय आणि अयोध्येत विजयी आगमन..... वगैरे.

पौरजनांच्या वसनांवरील डाग धुता धुता एका रजकाला एके दिवशी जानकीच्याही शीलावरील (कथित) कलंक दिसला की! केवळ तो कलंक त्या रजकाला दिसूनच थांबला नाही तर तो त्याने रामाच्याही नजरेपर्यंत पोचता केला.  रजकाने हा कलंक दाखवून दिला काय आणि त्या मर्यादापुरुषोत्तमाने तिला वनवासानंतर पुन्हा लगचेच दुसऱ्या वनवासाचा `बोनस`ही देऊन टाकला काय...! साराच मामला सरळ! चौदा वर्षे एकनिष्ठेने `वनवास हा सुखाचा` असे केवळ पतीच्या सहवासाच्या आधारे म्हणणाऱ्या जानकीला मिळालेली ही `बक्षीशी`च म्हणायची! वर पुन्हा प्रजेच्या मनात सीतेविषयी कुठलाही किंतु-किल्मिष राहू नये म्हणून रामाने असे केले हो, असे प्रवचनकार-कीर्तनकार दांभिकपणे म्हणायला मोकळे. (... आणि कलंकक्षालनामुळे रामही मोकळा! ).  चौदा वर्षांच्या निकट सहवासानंतरही सीतेचे मन रामाला कळले नाही? तिच्यावर त्याचा विश्वास नव्हता? केवळ तिचे `डागाळलेले` शील हाच त्यालाही (पौरजनांच्या समाधानासाठी का होईना... ) त्याच्या, त्याच्या कुटुंबीयांच्या, समस्त अयोध्येच्या संस्कृतीवरील घाला वाटला काय?

तो रजक हा भारतातील पहिला `संस्कृतिरक्षक`! काही काळ का होईना, त्याने संस्कृतिरक्षणाची लढाई  जिंकली... तीही रावणासारख्या बलाढ्याला यमसदनी पाठवून आलेल्या रामाला हरवून! त्या रजकाच्या बायकोबद्दल कुणी असा आक्षेप घेतला असता तर त्याने कलंक धुण्यासाठी कोणता साबण वापरला असता कुणास ठाऊक!!!

रजकाची जीभ रामाने त्याच वेळी का हासडली नाही? त्याला काय आडवे आले?

................

दुसरे उदाहरण महाभारतातील. वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदी रजस्वला होती, एकवस्त्रा होती. आणि हे माहीत असूनही दुःशासनाकडून तिचे ते एकुलते एक वस्त्र हरण केले जात असताना पांडवांनी काय केले? खाली माना घालून नुसते बसून राहिले. सत्त्वशील आणि तत्त्वशील धर्मराजाचा आणि सभेतील वयोवृद्धांचा नाइलाजच होता ना! (कृष्णसखा होता म्हणून तरी बरे! )... या वेळी द्रौपदीचे - पर्यायाने संस्कृतीचेच की! - संरक्षण करायला पाचांपैकी कुणीही पुढे सरसावला नाही. भीम जागच्या जागी चवताळायचा... पण धर्मराजाने डोळे वटारले की, गप्प! पत्नीला तिच्या संमतीशिवाय द्यूतात पणाला लावणे ही त्या काळची संस्कृती. पण पुढे तिची भरसभेत लाज जाताना तरी ही संस्कृती  खवळून उठावी की नाही? तत्त्वाचा दंभ, तत्त्वाची दांभिक नशा तेव्हातरी खाडकन उतरावी की नाही? पण नाही. (चारचौघांत जिचे वस्त्रहरण झाले, ती बायको आता आम्हाला नको, असे नंतर पाचहीजण म्हणाले नाहीत, हे द्रौपदीचे नशीबच म्हणायचे! )... इथेही काही वेळ जिंकले ते द्रौपदीच्या शीलावर टपलेलेच लोक!

भीमाची इच्छा असूनही दुःशासनाचे हात उखडण्याची अनुज्ञा धर्मराजाने भीमाला  का दिली नाही? त्याला काय आडवे आले?

................

सीता असो की द्रौपदी. दोघींमधील समान घटक होता तो शील हाच. (म्हणजे तुमची-आमची ती संस्कृतीच की काय? )
घडलेल्या घटनांमध्ये या दोघींचा दोष काय?   शून्य!... पण दोघींमधील समानताही हीच की.... दोघीही अग्निपरीक्षेतून तावून-सुलाखून निघाल्या. (एकीचा तर जन्मच अग्नीमधून झालेला)... आणि म्हणूनच दोघीही प्रातःस्मरणीय झाल्या!

................

दांभिकता ही संस्कृतीला लागलेली मोठी कीड आहे... ती नष्ट होईल तेव्हा होवो... तोवर आहेच आपल्याला हा कडबा. चावायला... रवंथ करायला... :)

................

जाता जाता - All women are chaste where there are no men!   या उक्तीवर काही वेगळे भाष्य करायची गरज आहे?
................

समस्त कविमंडळींसाठीचे ते वाक्य शेवटी पुन्हा आठवले - A savage in civilized society....!!!

...तेव्हा एका कवीकडून म्हणजेच सॅव्हिजकडून संस्कृतीसंदर्भात मांडलेले हे दृष्ठिकोन कोणाला कितपत रुचतील कुणास ठाऊक! रुचतील तर ठीकच... न रुचतील तर एका सॅव्हिजची आदिकाळातील अगम्य भाषेतील बडबड समजून विसरून जा कसे!

................