हा प्रतिसादही चॅस्टीटी बेल्टमध्येच जखडून राहिला आहे.  

कल्चर आणि सिविलाजेशनला मराठीत दोन वेगळे शब्द असावेत का याबाबत साशंकता वाटते.

गाईचे आणि बाईचे महत्त्व भारतात समान राहिले आहे. दोघींचा प्रमुख उपयोग गरजा पुरवणे आणि उपजिविकेसाठी अधिक नर उत्पन्न करणे हाच आहे. एका अर्थी ती पुरूषाची संपत्ती ठरते. त्याचा अहंकार, आत्मसन्मान. अर्थातच, मालकाला आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा हक्क आहे, अहंकार कुरवाळण्याचा हक्क आहे असा ग्रह अनेक पुरूषांचा झाला असल्यास नवल नाही. धर्मराजाने याच कैफात द्रौपदीला पणाला लावले. स्वतःच्या भावांना आणि स्वतःलाही पणाला लावले. आईला पणाला का लावले नाही हा प्रश्न मला अनेकदा पडतो परंतु धर्मराज दौपदीला हरून बसल्यावर धर्मरक्षण करत का बसला हा प्रश्न पडत नाही कारण त्या व्यक्तिरेखेची ती प्रवृत्ती आहे. भीमाबद्दल बोलायचे झाले तर तो स्वतःच दास झाला होता म्हणून वांझोटा राग काढत बसला. कदाचित, भीमाला हसणारे पुरूष आजही त्यांच्या बायकांची एखाद्याने छेड काढली तर "जाऊ दे गं! दुर्लक्ष कर. " असा सल्ला देऊन गप्प राहतात. त्यामुळे हा नक्की संस्कृतीचा मामला आहे का काय हे कळणे अवघड आहे.

असो.

 रामायणाचे बालकांड आणि उत्तरकांड वाल्मिकींनी लिहिले नसावे अशी शंका अनेक तज्ञ घेतात. मागे एकदा प्रा. राम शेवाळकरांचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. त्यांच्यामते वाल्मिकिंचा राम मानवी आहे. तो सीतेवर कुरघोडी करत नाही. वाल्मिकिंची सीताही अबला नाही. ती तोंड उघडून प्रत्युत्तर करण्यात प्रवीण आहे. इतकी की स्वतःच्या दीराला तू भाऊ मरण्याची वाट बघतो आहेस कारण तुझा माझ्यावर डोळा आहे असे सांगते. आजच्या संस्कृतीतील कोणती सभ्य बाई चटकन असा संशय घेईल? तुलसीदासांनी रामायणात नेमकी कुठे कुठे आणि कशी कशी भर घातली याचे तपशील माझ्याकडे नाहीत परंतु भर घातली हे निश्चित. महाभारताचेही लाखभर श्लोक (चू. भू. दे. घे) कसे गोळा झाले हे सर्वज्ञात आहे.

उर्वशीचे म्हटले तर अप्सरांना मानवी नितीनियम लागू नव्हते असे सांगितले जाते. त्याकारणाने अर्जुनाला तिने भुलवण्याचा प्रयत्न करणे पुराणात दिसून येते. तिचा शाप फळला यातच बरेचसे आले.   अहल्येचा पुत्र जनक राजाचा सल्लागार होता (मला वाटतं वामदेव नाव). एवढ्या मोठ्या मुलाची आई देवेंद्राशी संग करते तेव्हा नवरा सोडून जाईल नाहीतर काय करेल - गौतमाने अहल्येचा दगड केल्याचे रामायण सांगत नाही. दुष्यंत सोडून गेल्यावर शकुंतलेला तीन वर्षांनी भरत होतो परंतु तरीही तो दुष्यंताचाच मुलगा असल्याचे मानले जाते. कुंती आणि माद्री नियोगाने पुत्र जन्माला घालतात पण त्यांना कोणी वाळीत टाकत नाही. वारस मेल्यावर सत्यवती आपल्या पुत्राला व्यासाला आपल्या सुनांसोबत संग करायला सांगते. कुंती अनवधनाने पाचही मुलांनी द्रौपदीशी लग्न करावे असे म्हणाली तरी नंतर राजकारण आणि एकी राहावी म्हणून त्याला संमती देते.

आता पुराणकालीन स्त्रियांची स्थिती पाहा -

पाण्याच्या आसपास राहणाऱ्या या अप्सरा नौकानयन, व्यापार, नृत्यगायन यांत निपुण होत्या. अथर्ववेदाच्या दुसऱ्या मंडलात म्हटले आहे की त्या समुद्रमार्गे परदेशांशी व्यापार करत. गार्गीने याज्ञवल्क्याला विवादात असे काही नामोहरम केले की तुझे डोके उडवतो असे तो वैतागून म्हणाला. इथे त्याचा अहंकार दिसतो तशी गार्गीमधील विदुषीही दिसतेच. याच याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी देखील विदुषी आहे. आपला अहंकार दुखावेल म्हणून तो अडाणी स्त्रीशी लग्न करत नाही. ऐतेरेय ब्राह्मण असे वेदावरील भाष्याला आपल्या आईवरून नाव देणारा इतरेचा पुत्रही आढळतो. महाभारतात सुभद्रा अर्जुनाचे अपहरण करते तर रामायणात कैकयी दशरथाचे सारथ्य करते.

यावरून दांभिक कोण? हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेले वाल्मिकी आणि व्यास का त्यांच्या गोष्टी हव्या तशा ट्विस्ट करून धांगडधिंगा घालणारे संस्कृती रक्षक? द्रौपदी आणि सीतेची विटंबना कोण करत आहे? दुर्योधन दुःशासनाने केली तेवढीच ती पाचांची पत्नी असे म्हणून हसणारे आणि संस्कृती म्हणजे काय रे भाऊ असे विचारणारे लोक. संस्कृती म्हटली की सीता आणि द्रौपदीचीच आठवणारे लोक?

आता इतर संस्कृतींकडे पाहिले तर ज्या ज्या संस्कृतीला (सिविलायजेशन) पहिला मानव कोण असा प्रश्न पडला त्या त्या संस्कृतीने त्या मानवाचा वंश वाढवण्यासाठी सहसा त्याचे आपल्या बहिणीशी संबंध जोडल्याचे दिसते. ऍडमच्या बरगडीपासून निर्माण झालेली इव्ह किंवा एक सहज आठवलेले उदाहरण द्यायचे झाले तर इजिप्शियन संस्कृतीतील ओसायरस आणि आयसिस तसेच नत आणि गेब हे एकमेकांचे सख्खे नातलगच झाले की. तर मग, भारतीय संस्कृती वेगळी कशी असेल? अनेक संस्कृती मानतात की संभोगातून (आकाश धरतीचे इ. ) प्रजोत्पत्ती झाली. लिंग आणि योनीची पूजा भारतात चालतेच की.

हे जे सर्व आहे तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या पुराणकथा, दंतकथा आपला वारसा आहे. कोणी कितीही म्हटलं तरी या संस्कृतीशिवाय आपले पान हलत नाही. इथेच बघा किती प्रतिसाद गोळा झाले. संस्कृतीला स्वतःच्या स्वार्थी व्याख्येत बसवून तिचे पालन करणे न करणे ही फारच वेगळी गोष्ट झाली. काही स्वार्थी लोक आपल्या स्वार्थासाठी दिशाभूल करत राहतात आणि काही ज्ञानी लोक त्यांना विरोध करताना भरकटत जातात. माझ्यामते दोघांनाही संस्कृतीची व्याख्या समजण्याची गरज आहे.

धन्यवाद!