".....हो, पपा, नक्की", रोहित वेळ न दवडता म्हणाला. रिचाचा चेहरा आठवून त्याला मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या. पण प्रोफेसर महोदय पायमोजे घालण्यात व्यस्त आणि ममा रंगरंगोटीत. त्यामुळे आरशाव्यतिरिक्त त्या कुणालाच दिसल्या नाहीत.
पाचशेची नोट ठेवताना खिशातलं पाकीट उघडून रोहितनं रिचाचा फोटोचं हळुवार चुंबन घेतलं.

रोहित आणि रिचा दोघंही नववीत. एकाच शाळेत, पण वेगवेगळ्या तुकडीत! नुकत्याच सुरू झालेल्या दहावीच्या तयारीच्या तासाला दोघांची ओळख झाली आणि अजाणतेपणी मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही कळले नाही. तेव्हापासून दोघंही दहावीचा तास चुकवून  फिरायला जात. कधी मरीन ड्राइव्हला तर कधी जुहू बीचवर, आणि काहीच नाहीतर, लोकलमध्ये एकमेकाना खेटून बसून कर्जत पर्यंत जायचं आणि उलटं परत यायचं, हे नित्याचंच झालं होतं. सकाळची शाळा आणि दुपारी घरी विचारणारं कुणी नाही, हे दोघांच्याही पथ्यावर पडलं होतं.

आज शेवटचे दोन तास ऑफ होते, त्यामुळे आज  रोहित दहा वाजताच मोकळा होणार होता. सकाळपासून रिचाला कुठे फिरायला न्यायचं, याचेच मनसुबे रचण्यात तो मग्न होता. आणि आज मिळालेले पाचशे रुपये म्हणजे तर बंपर लॉटरी होती. त्याला कधी एकदा शाळेत पोचतोय, असं झालं.

"रिचू, आज तू दहा वाजताच शाळेसमोरच्या एसटिडी बूथवर भेट, ओके? ", रोहितनं रिचाचा मोबाईल लावला.

"अरे पण, " रिचा काहिशी संदिग्ध वाटली.

"अगं, अरे बिरे काय नाय, आपुनकी आज लॉटरी लगी है, ऐश करेंगे, आज दहाला भेट म्हंजे भेटच", रोहित आग्रहानं म्हणाला. रोहितची ही बोलण्याची  आणि आपल्यावर हुकुमत गाजवायची  ष्टाईल रिचाला भावली होती...