राजीवचे मन लावून शिकवणे, त्या चार जणांचे त्याच्या भोवती कोंडाळे करून बसणे व त्यालाच वर्ग म्हणणे हे सगळे ती आठवत असतानाच एजीएम ने बोलावल्याचा निरोप घेऊन शिपाई आला.
"बिना, ऑफिसच्या उद्घाटनाच्या आमंत्रिताची यादी तयार झाली? " एजीएमनी विचारले.
"हो सर, रावतेंकडे दिली आहे, तेच सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्डस पाठवणार आहेत. "
"आपल्याला नवे टार्गेट दिले आहे, सगळ्या एजंटांना मीटिंगसाठी बोलवा; शनिवारी दुपारी ४ ची वेळ द्या"
"बापरे आता नवीन टार्गेट म्हणजे डबल काम येणार असे दिसतेय. " बिना रावतेंच्या टेबलावर जाऊन पुटपुटली.
रावतेंनी हातातल्या कामात व्यस्त असल्याचे दाखवत तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
*********
राजीव वडिलांच्या घरी फोन करायला साफ विसरला होता. सहकार्यांत ते एकत्र राहतात हा समज होता.
डिसुझा बाई, इनामदार व तो सादरीकरणावरच्या विषयावर बोलत असताना त्याच्या भ्रमणध्वनीवर वडिलांचा फोन आला.
"बोला बाबा.... " त्याच्या बोलण्यातला त्रोटकपणा स्पष्ट दिसत होता.
"माझी औषधे संपली आहेत, कॉलेजहून घरी जाताना जरा नवीन औषधे पोहचवशील का? " तीर्थरूप काकुळतीला येऊन म्हणाले
"बघतो कसे जमतेय ते"
"नसेल जमणार तर राहू दे; मी आजचा दिवस नाही घेणार औषधे"
"नाही तसे नाही पण मी प्रयत्न करतो वळण्याचा" हे बोलत असतानाच फोन कट झाल्याचा आवाज त्याला आला.
डिसुझा बाई मधाळ नजरेने बघते आहे हे लक्षात येताच तो स्मितहास्य देऊन सादरीकरणाच्या विषयाकडे वळला.
........................................