असे वाटणे साहजिक आहे.
प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. काही जण हळवे असतात, काही खंबीर. प्रेमाची गरज प्रत्येकाला असते, फक्त प्रेम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपल्या काही अपेक्षा असतात, त्यातल्या सगळ्या पूर्ण होतीलच असे नाही. पण जर आपला विश्वास असेल की आपला जोडीदार आपल्या नात्याच्या भल्यासाठीच वागेल, तर वाद-विवाद होऊन देखील ते टोकाला कधी जाणार नाहीत.
आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट, जसेच्या तसे स्वीकार करायचे असते. अर्थात् याचा अर्थ असा मुळीच नाही की ते दोष दूर होवू नयेत किंवा त्यासाठी त्याने/आपण प्रयत्न करू नयेत. पण त्यावर प्रेमाचा पाया अवलंबून असू नये. ते दोष आहेत म्हणून आपले प्रेम कमी होवू नये. तसे झाले तर ती तडजोड ठरते अन् त्रासदायक असते.
उदा. आईचे जसे प्रेम बाळावर असते, त्याला कधी कमीपणा येत नाही. बाळातील दोष दूर करण्याचा प्रयत्न अन् गुणांची जपणूक, दोन्हीही करत असताना, आईचे अपत्यावरील प्रेम कधी कमी होत नाही. तिला अपत्य सारखेच गोजिरे असते!
खरे म्हटले तर जगात प्रत्येकजण, कळत/नकळत, केवळ प्रेमासाठीच जगत असतो. याबाबतीत श्रीमहाराजांचे म्हणणे नेहमीच सगळ्यांनी लक्षात ठेवावे असे आहे. ते म्हणतात,
"कधी कुणाचे मन दुखवू नये. मन ही माझी विभूती असे भगवंत स्वतः गीतेत म्हणतात. त्यामुळे मन दुखवणे म्हणजे भगवंताला दुखवल्यासारखे होते. आपले बोलणे अगदी गोड असावे. नजरेतसुद्धा प्रेम असले पाहिजे."
येवढे भान ठेवले तर आणखी काय करायला हवे आनंदाने जगण्यासाठी? 