शीर्षक वाचून दचकलो होतो. म्हटले, झाली, एकेक बुरुज ढासळायला सुरुवात झाली. पण धरणीने ओढलेली हिरवीगार ओढणी (याला कुरता, स्पॅघेटी टॉप, पदर... काहीही म्हणावे) , सृष्टीचा तृप्त हुंकार, बळीराजाचा फुललेला चेहरा, पावसाचे थेंब झेलीत साहावळ्या विठूच्या दर्शनाला जाणारा  भोळाभाबडा वारकरी, इतके आणि तितके रिंगण (अधिक माहितीसाठी 'सकाळ' वाचा), आकाशातील मेघांची दाटी, थुईथुई नाचणारे मोर आणि एकूणच 'सृष्टीचे कवतिक हे जाण बाळा' यातले काहीही लेखात नसल्याने आनंद झाला. संतोष, परम संतोष!
सकाळच्या चहाबरोबर पाऊस असावा. रात्रीच्या रमबरोबरही. त्यासाठी भुशी डॅमच्या धबधब्यात बसून पोलिसाला चुकवून चोरटा घुटका घ्यायची गरज नाही. घरातल्या उशा आणि तक्के मलूल झाले आहेत, पण वाचायला नवीन चांगलेसे पुस्तक आहे हे थोर आहे. फ्लॅटच्या कोपऱ्यातून ओल आली आहे, पण तिला आपण तूर्त एक सीझनल अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग समजू...
लेख आवडला हे लिहायला विसरतच होतो.