नरेंद्र,
मला वाटते तुमच्या भावना पूर्णपणे कळण्यात मला यश आले आहे आणि त्याबद्दल माझ्या मनात असायला हवाच तो आदरही आहेच. तरीही...

>विविधभाषक लोकांच्यात वावरतांना संस्कृती हळूहळू धेडगुजरी होण्याची दाट शक्यता असते.
इथे थोडीश्शी गफलत होतेय बहुदा. संस्कृती हा भाग माझ्यावर बालपणापासून झालेल्या संस्कारांवर अवलंबून असावा. माझ्या संस्कारांवर माझ्या सध्ध्याच्या धेडगुजरी भाषेचे परिणाम होत असावेत असे वाटत नाही. संस्कृतीमध्ये जर भाषेच्या योगदानाकडे आपला निर्देश असेल तर मला वाटते मी जितकी मराठी आहे त्याहून जास्त इतरभाषिक आहे कारण लहानपणी मला जितका शेजार वा दोस्त मराठीचे असायला हवे होते त्याहून जास्त हिंदी, उर्दू, पारशी, सिंधी वगैरे मिळाले. संस्कृती वगैरे 'हायफंडू' शब्दांचे नेमके अर्थ मला माहिती नाहीत पण बंबैया हिंदीत बोलल्याने माझा मूळ पापभीरू पिंड बदलत असेल असे वाटत नाही.

> तेव्हा मराठी बोलतांना शुद्ध मराठी, हिंदी बोलतांना शुद्ध हिंदी आणि इंग्रजी बोलतांना शुद्ध इंग्रजी वापरणे चांगले.
आपल्याबद्दल पूर्ण आदर राखून मला असे खेदाने सांगावेसे वाटते की असे केल्यास मला आत्ता माझे आहे तसे विस्तृत दोस्तमंडळ बनवता आले नसते. आज माझे जितके मराठी दोस्त आहेत त्याहून कैकपटींनी जास्त इतरभाषिक दोस्त आहेत. भाषेचा वापर मी तरी केवळ संवाद साधायला मला मिळालेले साधन इतकाच करते आणि तितकाच तो करण्याची माझी पात्रता आहे. मला शुद्ध बोलता येत नाही असे नाही पण तसे बोलून मी किती जणांपर्यंत पोहोचू शकेन हे जास्त महत्त्वाचे. शेवटी 'व्हॉट मॅटर्स मोअर इज द प्रॉडक्टीव्हिटी' ! हे माझे व्यक्तिगत मत आहे. रोममध्ये असताना रोमनसारखे वागले पाहिजे तत्त्वानुसार मनोगतवर असल्यावर शुद्ध मराठी बोलले पाहिजे, हे अगदी मान्य. तसा प्रयत्न करण्याच्या नादातच मला मनोगतवर लिहिणेच जमेनासे झाले होते. आता तसे व्हायचे नाही असे वाटत असतानाच नेमकी नमनालाच अनवधानाने इतकी घोडचूक करून बसले. इथून पुढे अशी चूक होणार नाही याबद्दल काळजी घेईन. 

> शिवाय, आपापसात बोलतांना जे स्थल, काल, व्यक्तीसापेक्ष पारिभाषिक शब्द दैनंदिन जीवनात आपण घडवत असतो ते
> सार्वजनिक लिखाण करतांना संदर्भासहित स्पष्ट करावेत. म्हणजे इतरांना अगम्य वाटत नाहीत.
हे ध्यानात आले नव्हते. बरे झाले सांगितलेत. जरूर काहितरी करायचा प्रयत्न करेन याबद्दलही.

>जे अत्यंत उत्स्फूर्त लिखाण करणारे मोजके महाजालीय लेखक आहेत त्यात तुझा अंतर्भाव आहे.
उत्स्फूर्तता तर अगदी कुटून कुटून भरलेली आहे माझ्यात आणि ती लिखाणात येते कारण माझा 'तोंडाचे मडके फुटले असते' इतका बडबडेपणा ! बाकी लेखक वगैरे म्हणवले जावे अशी पात्रता माझ्यात नाही, ती मी मनी ठरवूनही मला माझ्यात बाणवता येणे नाही त्यामुळे 'जे येणे नाही त्याचा नाद सोड'लाय !

>म्हणूनच तुझ्या मनावर घेण्यालाही विशेष अर्थ आहे व म्हणूनच माझ्या सांगण्यालाही.
मी मनावर घेतले आहे मनोगतपुरते आणि तुमच्या सांगण्यामागील कळकळ मला माहिती आहे त्यामुळे त्यातला आणि त्यामागीलही अर्थ पुरेपुर कळलाय आणि मान्यही आहे.