मी मुमुक्षू यांच्याशी सहमत आहे :

आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट, जसेच्या तसे स्वीकार करायचे असते. अर्थात याचा अर्थ असा मुळीच नाही की ते दोष दूर होवू नयेत किंवा त्यासाठी त्याने/आपण प्रयत्न करू नयेत. पण त्यावर प्रेमाचा पाया अवलंबून असू नये. ते दोष आहेत म्हणून आपले प्रेम कमी होवू नये. तसे झाले तर ती तडजोड ठरते अन त्रासदायक असते.  
उदा. आईचे जसे प्रेम बाळावर असते, त्याला कधी कमीपणा येत नाही. बाळातील दोष दूर करण्याचा प्रयत्न अन गुणांची जपणूक, दोन्हीही करत असताना, आईचे अपत्यावरील प्रेम कधी कमी होत नाही. तिला अपत्य सारखेच गोजिरे असते!

प्रेम जरूर करावे, ती माणसाची गरजच आहे पण ते निरपेक्ष असायला हवे. ( अन कंडीशनल ! असे मातृभाषेत सांगायला हवे!)  वर उदाहरण दिल्याप्रमाणे, आईसारखे!

आणि नवरा- बायकोचे प्रेमसुद्धा असेच असायला हवे :

म्हणजे, तू सुंदर दिसतेस/दिसतोस, कधीतरी एक दिवस हे सुंदर रेशमी केस, रेखीव चेहरा, सुडौल शरीर निघून जाणार आहे त्याची मला जाणीव आहे आणि तरीही मी तुला साथ देईन, ही भावना असायला हवी, नातिचरामि... ती सात पाऊले म्हणजे तरी काय?

आपल्याकडे विवाह हा संस्कार आहे , करार नव्हे! तो याच अर्थाने! धर्म,अर्थ,काम,मोक्ष या सर्व आघाड्यांवर आम्ही एकमेकांसोबत राहू अशी प्रतिज्ञा! (शरीर सुख हा " काम" विषयातला अत्यंतिक छोटा भाग, हे विवाहाचे नक्किच कारण नव्हे! धर्माचरण करायचेच झाल्यास, केवळ प्रजोत्पादनासाठीच! )म्हणून तर सत्यनारायणाच्या पूजेला, पुण्याहवाचनाला जोडीने बसण्याची पद्धत आहे.

अगस्ती ऋषींच्या पत्नीला " लोपामुद्रा" म्हणत , म्हणजे, उभयतां एकमेकात " लोप " पावलेले! पुराणातले जाऊ द्या , आजूबाजूला पाहील्यास असे अनेक अगस्ती- लोपामुद्रा तुम्हाला दिसतील!

आता भांडणे का होतात ?

ती होतात "अहंकारा" मुळे! " मीच का? किंवा "मी का नाही?" या भावनेतून!

जेव्हा अहंकार प्रेमापेक्षा मोठा होतो तेव्हा भांडण होते. आपण अथवा आपला जोडिदार कुणीच परिपूर्ण नसतो, खरेतर एका परमेश्वराशिवाय कुणीच परिपूर्ण  नाही! मग माझ्या चूका त्याच्या/ तिच्या पेक्षा कमी आहेत, याला काय अर्थ आहे? पुन्हा कमी/जास्त हे सापेक्षच आहे ना!

तेव्हा आपला जोडिदार 'जसा आहे तसा' स्वीकारणे आणि त्याला/तिला  "हवा तसा घडवणे" हा त्यावरील उपाय! भांडणे होत असतील तर ..... अधिक प्रेम करा.. आणखी अधिक करा... इतके की..... आप-पर भाव लोप पावून अर्धनरी- नटेश्वराचे स्वरूप आले पाहीजे.!

अवघड आहे ..... अशक्य नाही!!!