महेश,

तुम्ही जरी 'अंगात शर्ट घालणे' हा प्रयोग कसा बरोबर आहे, आणि/किंवा 'शर्टात अंग घालणे' हा प्रयोग कसा चुकीचा आहे, हे सिद्ध करून दाखवलंत, तरी त्यातून काही साध्य होईल असं मला वाटत नाही, कारण हा प्रश्न केवळ इथेच आणि ह्या प्रयोगाबरोबर संपत नाही. त्याला अनेक पदर आहेत, अनेक पैलू, अनेक खाचाखोचा आहेत.

माझा भाषाशात्राचा अभ्यास नाही, पण जमेल तसं थोडे विचार मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. जरा लांबलचक आणि पाल्हाळीक लिहिल्याबद्दल आधीच माफी मागून ठेवतो.

भाषाशास्त्राप्रमाणे, आपण आधीच मान्य केल्याप्रमाणे, शुद्धलेखन (आणि शब्दसामग्री), व्याकरण, आणि अर्थ (lexical, syntactic, semantic) ही कुठल्याही भाषेची प्रमुख अंग असतात. एखाद्या भाषेचे शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे नियम पाळून, तिने आखून दिलेल्या कक्षेत, विविध शब्द्व वापरून, भावना, आशय, विचार व्यक्त करणारी वाक्यं तयार करणे, म्हणजे ती भाषा वापरणे, मग ती संगणकी भाषा असो, अथवा बोली भाषा (natural language) असो. संगणक तंत्रज्ञान मानवी मेंदूच्या मानानी कितीतरी मागासलेलं असल्यामुळे संगणकी भाषेचा वापर निःसंदिग्ध असावा लागतो, आणि त्यामध्ये व्यक्त होणारे विचार किंवा कल्पना तितक्याच मर्यादित असतात (ह्या क्षेत्रातही हळूहळू प्रगति होत आहे, पण तो ह्या चर्चेचा विषय नाही). त्यामुळे जसं भूमितीतले प्रमेय सिद्ध करता येतात, तसंच काही प्रमाणात संगणकी भाषेत लिहिलेले 'विचार' सिद्ध करता येतात.

ह्याउलट बोली भाषेचं आहे. ह्या भाषा शुद्धलेखन आणि व्याकरणापलिकडे जाऊन, इतर अनेक साधनं उपलब्ध करून देतात - वाक्प्रचार, अलंकार आणि म्हणी तर आहेतच, शिवाय ऐतिहासिक, स्थानिक, भौगोलिक, सांस्कृतिक संदर्भही आशय व्यक्त करण्यात मौलिक काम बजावतात. शब्दांना सुद्धा संदर्भामुळे विविध अर्थ किंवा अर्थछटा प्राप्त होतात. तेच शब्द वेगळ्या क्रमाने वापरून वेगळे अर्थ किंवा भावना व्यक्त करता येतात. त्यापलिकडेही जाऊन, बोलताना, चढ उतार वा वजन वापरून अजूनही छटा आणता येतात हे वेगळंच. काळाप्रमाणे ह्या साधनांमध्ये नित्याची भर पडत असतेच. पण गंमत म्हणजे हे सर्व घडत असताना, मूलभूत शुध्दलेखनाचे वा व्याकरणाचे नियम बदलायची आपल्याला फारशी गरज भासत नाही (ह्याच आशयाचं चॉम्स्की ह्या विख्यात भाषातज्ञाचं एक वाक्य आहे, ते मला सापडलं की प्रस्तुत करीन). असं सर्व असताना, विशेष अर्थ व्यक्त करणार्‍या एखाद्या शब्दसमूहाला, तांत्रिक, शास्त्रीय, वा वैज्ञानिक निकष लावायचा अट्टहास आपण धरू नये असं मला वाटतं.

'अंगात शर्ट घालणे' म्हणजे केवळ शर्टाच्या आतली पोकळी आपल्या अंगाने भरून काढणे असं नव्हे. त्यात अनेक क्रिया अभिप्रेत आहेत - बाह्यांमध्ये हात घालणे, बटणं लावणे, कॉलर ठीक करणे वगैरे. म्हणजे शर्टात अंग घातल्यावर हे सगळं तुम्हाला करायला लागणारच, तेच 'अंगात शर्ट घालणे' ह्या क्रियेत आलं.

मोरु अनुक्रमे शर्ट, विजार, टाय, मोजे, आणि बूट ह्या वस्तुंमध्ये शिरला. हेच आपण थोडक्यातही म्हणू शकलो असतो की 'मोरुने कपडे केले'. म्हणजे मग त्याने कापड बेतून, फाडून आणि शिवून घातले का? नाही. आपल्याला तो नक्की कशाकशात शिरला, ह्या तपशीलात शिरायचे नसेल, किंवा काय ते संदर्भावरून कळणार असेल. 'मैनाने कपडे केले', म्हणजे तिने प्रसंगानुरूप अंगाभोवती साडी गुंडाळली असेल, किंवा ती विजारीत शिरली असेल.

मग पुढे 'मोरुने राघूला कपडे केले' - म्हणजे त्याने राघूला गणवेषात शिरायला मदत केली का? नाही. मोरुने (स्वखर्चाने) राघूसाठी तयार कपडे विकत आणले, अथवा शिंप्याकडून शिवून घेतले.

वर आपण काही वाक्प्रचार पाहिले. आता -

'मी नाकात पेन्सिल घातली'

'मी नाकात नथ घातली'

दोन्ही वाक्य एक शब्द वगळता सारखीच आहेत, आणि एकच क्रिया दर्शवतात. 'नाकात पेन्सिल घातली' म्हणजे एक लांबट वस्तू जिथून श्वास घेतो त्या पोकळीत सारली. आपल्याला नथ हा काय प्रकार आहे हे माहीत नसलं, तर आपण नथ ह्या अज्ञात वस्तूलाही त्याच मार्गाने पाठवून देऊ. नाहीतर तसं होऊ नये म्हणून दर वेळेस 'नाकपुडीला पाडलेल्या छिद्रात ...' वगैरे म्हणू. अर्थात आपल्याला नथ काय आहे हे माहित असल्यास आपण त्या क्रियेचा बरोबर अर्थ लावू.

'चेंडू पकडणे' म्हणजे साधारणपणे 'आपल्या दिशेने फेकल्या गेलेल्या चेंडूला पकडणे', 'फुलपाखरू पकडणे' म्हणजे साधारणपणे 'फुलपाखाराच्या मागे पळत जाऊन ते पकडणे', आणि 'गाडी पकडणे' म्हणजे साधारणपणे 'वेळेवर जाऊन उभ्या असलेल्या गाडी मध्ये बसणे' (अर्थात आपण कधीकधी पळत पळत जाऊन गाडीमध्ये शिरतो, पण चेंडू पकडावा तशी पकडत कद्यी नाही.) एकाच क्रियापदाचे अनेक अर्थ! ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये काहीतरी शारिरीक क्रिया होती, पण -

'मोरुने गुडघा खाजवला' म्हणजे 'बहुतेक डास वगैरे चावला असावा', पण

'मोरुने डोकं खाजवलं' असता त्याच्या डोक्यात कोंडा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्याने हातही न हालवता केवळ बुद्धीला ताण दिला असण्याची शक्यताच जास्त आहे.

कुठल्याशा आफ्रिकन जमातीत एकमेकाला (स्वतःचं) नाक खाजवून अभिवादन करतात, असं लहानपणी वाचल्याचं अंधुकसं आठवतं. 'मी नार्‍याकडे बघून नाक खाजवलं' म्हणजे त्याला चिडवलं, पण 'मी मोटांबो कडे बघून नाक खाजवलं' हे कदाचित त्या भाषेत नैसर्गिक वाटत असेल. ह्याउलट कदाचित त्या भाषेत 'मी मोटांबोला अभिवादन केलं', म्हणजे प्रत्यक्षात 'नाक खाजवलं' असं ही असू शकेल.

मराठी, हिंदी इत्यादि भाषांमध्ये शब्दांचे क्रम बदलूनही वेगळे परिणाम साधता येतात. वडिल जेव्हा मुलाला विचारतात -

'कुठे चाललास?' तेव्हा केवळ मुलगा कुठे चालला आहे हे जाणून घ्यायची इच्छा असते, पण -

'चाललास कुठे?' ह्याचा अर्थ 'इथेच थांब नाहीतर तंगडं मोडून हातात देईन!' असा असायची शक्यता जास्त.

अलंकार, म्हणी ह्यांचा तर उपयोग तर मोजक्या शब्दात फारच मोठे परिणाम साधण्यासाठी होतो, त्याबद्दल आत्ता बोलायची जरुर नाही. सारांश इतकाच की तिथे वाक्यांची शास्त्रीयरित्या फोड करून अर्थ काढण्याचा प्रयत्न एकंदर फोल ठरतो. अर्थात ज्या वाक्यांची अशा प्रकारे फोड करून निःसंदिग्धपणे अर्थ काढता येत नाही अशी वाक्य/वाक्प्रचार वापरूच नयेत, असाही हट्ट धरता येईल, पण ते भाषेच्या दृष्टीने मारक ठरेल.

----------------------------------------

शेवटी, पुन्हा एकदा नमूद करावसं वाटतं, की ह्या पूर्ण चर्चेत कुठेही, ग्रामीण अथवा इतर बोलींना कमी लेखण्याचा उद्देश नाही. ग्रामीण भाषांमध्ये विपुल काव्य आणि गद्य लेखन केलं गेलेलं आहे, तसंच लक्षावधी लोकं ही बोली बोलतात आणि पुढेही बोलतील. बोलीचा आणि विचारांच्या परिपक्वपणाचा अथवा गहनतेचा काहीही संबंध नाही.