तत्काल ह्या व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दाचे तात्काळ असे मराठीकरण झालेले आहे, (जसे मंजरी चे मंजिरी, अजागल चे अजागळ, मालाचे माळहे मराठीकरण आहे तसे) त्यामुळे मराठीत तात्काळ का शब्द आहे.
संस्कृतमध्ये मंजरि, मंजरी, मंजा, मंजि, मंजी असे कमीतकमी चार शब्द झाडाचा मोहोर या अर्थी आहेत.  त्यातला मंजरी मराठीत आहे. हिंदीत मंजरी, मंजि आणि मंजी हे तीन शब्द आहेत. भाषा अधिक गोड वाटावी म्हणून शब्दातल्या दुसऱ्या अकाराची इकार करणे मराठी रूढी आहे, आणि त्यामुळे असे शब्द अशुद्ध समजले जात नाहीत. मंजरी-मंजिरी, साजरी-साजिरी, गोजिरे, दळिता-कांडिता, कळिवणे, हरिवले अशी रूपे मराठीत होतात.

तसेच मूळ संस्कृतमधील 'ल'चा 'ळ' होऊन मराठीत शब्द बनतात. ह्या मराठी शब्दांचा अर्थ कधी तोच, कधी संकोचित, कधी विस्तारित तर कधी पूर्णपणे वेगळा असतो. 'माला'मध्ये तोच राहिला आहे (फक्त लिंग बदलले), 'मल'मध्ये संकोचित झाला आहे( कानात मळ असतो, मल नाही आणि मलावरोध नावाचा विकार आहे, मळावरोध नाही), अजागळमध्ये पूर्ण बदलला आहे.  जिथे 'काल' लागतो तिथे 'काळ' चालत नाही आणि कधीकधी याउलट.

तात्काळ(X)चे तसे नाही.  हा शब्दच व्युत्पत्तिसिद्ध नाही. पारंपारिक(X) ज्यांना खटकत नाही त्यांना तात्काळ(X)पण खटकणार नाही.  अधीन(X)च्या जागी आधीन लिहिणे, तसेच अध्यात्मिक(X), आजिबात(X), आधिकार(X), तत्कालिक(X), तात्कालीन(X), अल्पसंख्यक(X), अल्पसंख्यांक(X), प्रस्ताविक(X), प्रास्तावित(X), प्रसादिक(X), यात्किंचित(X), व्याभिचारी(X), व्यवहारिक(X), सहाय्य(X), सार्वकालीन(X), सर्वकालिक(X) अशी चुकीची रूपे लिहायचे टाळणे शक्य आहे.  

समाईक-सामाईक, हलणे- हालणे, हसणे- हासणे,  अशी दोन्ही प्रकारे लिहिली जाणारी रूपे थोडी.  भाषक आणि भाषिक दोन्ही बरोबर पण अर्थ भिन्‍न.