पाहा पटेल तर..

आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती आपल्या किती जवळ आहे यावरून आपली त्यांच्याशी वागणूक ठरत असते. आपोआप. हे साधे रूपक घ्या ना -
    एक व्यक्ती तुमच्यापासून २ हात अंतरावर उभी आहे अन् दुसरी २५ हात अंतरावर. आता तुम्ही जवळच्या व्यक्तीशी ज्या आवाजात बोलाल त्या आवाजात दूरच्या व्यक्तीशी बोलून उपयोग नाही, त्यास त्यातले एक अक्षरही समजणार नाही. त्यासाठी तुमचे त्या व्यक्तीमधले अंतर कमी झाले पाहिजे, नाही तर तुम्ही ओरडून बोलले पाहिजे. हे अंतर जोवर कमी होणार नाही तोवर तुमची अडचण दूर होणार नाही.
    तद्वतच, जर मने जवळ असली तर तुमच्या मनातील भावना दुसऱ्यापर्यंत पोचण्यास वेळ लागणार नाही. ज्या व्यक्तीला तुमच्या भावना कळत नाहीत तो मनाने तुमच्या जवळ नाही. आता हा निर्णय तुम्ही घ्यायचा की मानसिकरित्या त्या व्यक्तीच्याजवळ तुम्हास जायचे आहे किंवा नाही.

    आपण आपलेपणाने एखाद्याशी मैत्री करतो, स्वार्थ असतोच असे नाही. पण समोरच्याला तसे वाटत नसेल तर? तो गैरसमज आहे नाही तर ती व्यक्ती त्या आपलेपणाच्या पात्रतेची नाही.

    जगातील प्रत्येकाला प्रेम हवे असते. त्यासाठीच तो जगत असतो. ते त्याला मिळाले तर तो ते कधीही सोडत नाही, सोडणार नाही. आपण मनापासून प्रेम करावे, त्यात कमतरता येऊ नये. याउपरही समोरच्या व्यक्तीला ते समजत नसेल तरी आपण त्रास करून घेऊ नये. आपला स्वभाव सोडू नये. ती ऋषी अन् विंचवाची गोष्ट माहितीये ना?
    नदीमध्ये एक ऋषी अर्घ्य देत उभा असताना त्यास पाण्यातून वाहत जाणारा विंचू दिसतो. विंचवास वाचवण्यासाठी तो ऋषी हातांनी उचलून घेतो. त्याबरोबर तो विंचू डंख मारतो. कळवळून ऋषी त्याला सोडतो. पण परत तो वाहून जाऊ लागताच ऋषी फिरून त्याला उचलून घेतो. त्या विंचवाला ती भावना समजत नाही. तो परत डंख मारतो. असे बरेच वेळा होते. पण ऋषी आपले प्रयत्न सोडत नाही. शेवटी काठावर आल्यावर तो विंचवाला जमीनीवर सोडून देतो, पण तोवर त्याचा हात चांगलाच सुजला असतो. काठावरच उभा असलेला शिष्य ते पाहून ऋषीला विचारतो कि तो डंख मारत असतानाही तुम्ही त्याला का वाचवलेत? त्यावर ऋषी जे उत्तर देतो ते आदर्शवत आहे. तो म्हणतो, "डंख मारणे हा विंचवाचा स्वभाव आहे अन् प्रेम करणे हा माझा. मरणप्राय स्थितीमध्ये असताना सुद्धा तो आपला स्वभाव सोडत नाही, मग मी आपला स्वभाव का सोडावा?"
   अधिकारापेक्षा जास बोललो असे वाटले असेल तर क्षमस्व.